सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्या अकस्मात दौऱ्यामुळे मद्यपींची धावपळ

३१ डिसेंबरची रात्र असल्याने असलेला हषरेल्हास.. पहाटेपर्यंत सुरू असलेले बार.. आतमध्ये टेबलाभोवती जमलेली मैफल.. सोबत मद्याचे ग्लास आणि मांसाहारी चखना.. अशा बेधुंद वातावरणात तरुणाईचा जल्लोष सुरू असतानाच अचानक बारचे दार उघडते आणि कडक खाकी वेशातील अधिकारी व कर्मचारी आत शिरतात. पोलिसांचा छापा पडला असे समजून बेधुंद झालेल्या तरुणांची नशा खाडकन उतरते. सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना पाहताच बारमध्ये पळापळ सुरू होते; पण लक्ष्मीनारायण हे थेट तरुणांना गाठतात आणि त्यांच्याशी संवाद साधू लागतात. ‘तुम्ही एकीकडे मौजमजा करता आणि तिकडे कुटूंब तुमची वाट पाहत असते. तुम्ही त्यांच्यासोबत नसल्यामुळे त्यांनाही नववर्षांचा आनंद साजरा करता येत नाही. नववर्षांचे स्वागतच करायचे असेल तर ते कुटुंबासोबत करा. तसेच व्यसनांपासून दूर राहून आपल्या मुलांवरही संस्कार घडवा,’ असे शहाणपणाचे बोल तरुणांना सुनावतानाच ‘बार चालवण्यापेक्षा नव्या पिढीला समृद्ध करणारी ग्रंथालये चालवा..’ असे बारमालकांनाही खडसावत सहपोलीस आयुक्त बाहेर पडतात..

३१ डिसेंबरच्या रात्री ठाण्यातील बारमध्ये नववर्षांचे बेधुंद स्वागत करण्यासाठी जमलेल्या अनेकांना गुरुवारी हा अनुभव आला.  मार्गशीष महिना आणि गुरुवार असल्यामुळे थर्टी फस्र्टच्या दिवशी सायंकाळपर्यंत जल्लोषाचे फारसे वातावरण नव्हते, मात्र रात्री अकरानंतर हे चित्र बदलले. नववर्ष स्वागतासाठी अनेक जण बारच्या दिशेने वळू लागले आणि तेथील पाटर्य़ामध्ये सहभागी होऊ लागले. करमणूक कार्यक्रमातील गीतांवर मद्याच्या नशेत अनेक जण ठेकाही धरत होते. अशाप्रकारे नववर्षांचे जल्लोषात स्वागत सुरू असतानाच लक्ष्मीनारायण आणि त्यांचे पथक बारमध्ये तपासणीसाठी आल्याचे पाहून अनेकांची भंबेरी उडाली. बार कारवाईमुळे चर्चेत आलेले लक्ष्मीनारायण यांच्या नावानेच बारमालकांच्या मनात धडकी भरते. त्यातच थर्टी फस्र्टच्या रात्री बारमध्ये लक्ष्मीनारायण स्वत: तपासणीसाठी आल्याने बारमालकांना धक्काच बसला. बारमध्ये गैरप्रकार सुरू आहेत का, याची तपासणी पथकाकडून करण्यात येत होती. त्यामुळे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत लक्ष्मीनारायण आणि त्यांचे पथक विविध बारमध्ये अचानकपणे जाऊन तपासणी करीत होते.

हे करत असताना बारमध्ये मद्याच्या नशेत झिंगणाऱ्या तरुणांना लक्ष्मीनारायण हे शिक्षकाच्या भूमिकेत जाऊन कानमंत्र देतानाही दिसले. ‘व्यसनाधीन होण्यापेक्षा कुटुंबासोबत वेळ काढा. त्यांच्यासोबत नववर्ष साजरे करा’, असा सल्ला ते तरुणांना देत होते.  त्याचप्रमाणे बारच्या व्यवसायातून पिढय़ा व्यसनाधीन करण्यापेक्षा वाचनालय किंवा इतर विधायक उपक्रम राबवा, असा सल्ला त्यांनी बारमालकांना दिला. काही तरी पुण्य पदरात पाडून घ्या आणि समाजापुढे नवा आर्दश निर्माण होईल असे काही तरी करा, असेही त्यांनी यावेळी काही बार मालकांना सुनावले.

Story img Loader