कल्याण : दोन दिवस झोडपणाऱ्या मुसळधार पावसाने सोमवारी सकाळपासून विश्रांती घेतल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी या शहरांसह ठाणे जिल्ह्यातील अनेक गावांतील पूर ओसरू लागला आहे. मात्र, या पुरासोबत वाहून आलेला गाळ आणि कचरा तसाच साचून राहिला असल्याने सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. रविवारच्या पुराचा सर्वात फटका शहापूर तसेच कल्याण ग्रामीण भागातील गावांना बसला असला तरी टिटवाळा, कल्याण, डोंबिवली ते २७ गाव, पलावा परिसरातील २५ ते ३० हजारांपेक्षा अधिक कुटुंबांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

महापालिका, महसूल अधिकाऱ्यांनी मात्र परिसराचे प्रत्यक्ष सव्‍‌र्हेक्षण केल्यानंतर किती रहिवाशांना पुराचा फटका बसला किती आर्थिक नुकसान झाले याचा अंदाज काढता येईल, असे सांगितले. पुराचा सर्वाधिक फटका कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर, गोविंदवाडी, लालचौकी, आधारवाडी, शहाड, आंबिवली, अनुपमनगर, भवानीनगर, गांधारे, बारावे, मोहिली परिसराला बसला. टिटवाळा-मांडा भागातील बेकायदा चाळी पाच ते सहा फूट पाण्याखाली होते. या भागातील रहिवाशांनी टिटवाळा शहरी भागातील शाळा, समाज मंदिरांमध्ये आसरा घेतला होता. या रहिवाशांच्या घरातील लाकडी फर्निचर, बिछाने, फ्रिज, कपडे धुण्याच्या मशीन, दूरचित्रवाणी संच पाण्यात बुडाल्याने खराब झाले आहे. किराणा दुकानांदारांचे सर्वाधिक नुकसान झाले. सडलेले धान्य फेकून दिले जात आहे.

डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गरीबाचापाडा, रेतीबंदर खाडी किनारा भागातील तीन ते चार हजार बेकायदा चाळींना पुराच्या पाण्याचा फटका बसला. या भागातील रहिवाशांच्या घरांमध्ये सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पाणी होते. या रहिवाशांना परिसरातील मंदिरे, शाळांमध्ये आसरा घेतला होता. रविवारी संध्याकाळी ते रात्री उशिरापर्यंत खाडी किनारच्या जगदंबा माता परिसरातून पालिकेचे अभियंता महेश गुप्ते, गुरूनाथ म्हात्रे, अनमोल म्हात्रे, मनोज वैद्य, सोमनाथ भोईर, विजय भोईर या स्वयंसेवी पथकाने बाराशे रहिवाशांना पुरातून सुखरूप बाहेर काढले. या रहिवाशांची अनमोल नगरीत भोजन, निवासाची व्यवस्था या पथकाने केली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेची आपत्कालीन पथके काल दिवस-रात्र जागोजागी पुरात अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम करीत होती. डोंबिवली एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये पाणी घुसले होते. कामगारांना धोका नको म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने उत्पादन बंद ठेवण्यात आले होते. तो आर्थिक फटका बसल्याचे उद्योजकांनी सांगितले.

साथीची भीती

शहरातील अनेक सोसायटय़ांच्या आवारात, मलनिस्सारण वाहिन्यात पुराचे पाणी घुसले. त्यामुळे मल टाक्यांमधील पाणी तळाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमुळे शिरले आहे. त्यामुळे अनेक सोसायटय़ांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या टाक्यांमधील पाणी पिण्यास वापरले तर विविध प्रकारचे आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.