कला साधनेत अखंड मग्न असलेल्या कलावंतास वयाचा विसर पडतो. अशी व्यक्ती वृद्ध झाली तरी मनाने कायम तरूण राहते. डोंबिवलीतील औद्योगिक विभागात राहणाऱ्या सुधाकर देसाई यांनीही वयाच्या ८३ व्या वर्षी सलग सलग ५ आठवडे दरदिवशी सहा तास उभे राहून जलरंगातील संगीत हे म्युरल पेंटींग साकाराले आहे. विशेष म्हणजे त्यांना वयाच्या अठराव्या वर्षी सुचलेले हे चित्र ६५ वर्षांनंतर कॅनव्हासवर उतरले आहे. अडीच बाय साडे पाच फूट लांबी रुंदीचे हे भव्य म्युरल पेंटींग २२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, पालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय, डोंबिवली (पू.) येथे सकाळी १० ते सायंकाळी ८ यावेळेत भरणाऱ्या प्रदर्शनात पाहता येईल.
८३ वर्षांचे सुधाकर देसाई हे वयाच्या ११ व्या वर्षांपासून चित्र काढत आहेत. गेली ७० वर्षे त्यांनी आपली ही आवड जोपासली आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून फाईन आर्ट्सची पदविका पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यावसायिक चित्रे काढायला सुरूवात केली. आत्तापर्यंत त्यांनी हजारोंच्या संख्येने चित्रे साकारली आहेत. व्यक्तिचित्र, नैसर्गिक चित्र, भित्तीचित्र, सिनेमा पोस्टर आदी माध्यमात त्यांनी काम केले आहे. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, श्याम बेनेगल, जब्बार पटेल यांसारख्या दिग्गजांची चित्रे काढून त्यांनी त्यांना भेट स्वरुपात दिली आहेत. त्यांच्या चित्रांचे कलाकारांकडून कौतुकही झाले आहे. त्यांच्या नव्या या चित्र प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे जलरंगातील संगीत चित्र. देसाई यांना १९५० मध्ये हे चित्र सुचले. मात्र काही केल्या मध्यंतरीच्या दिर्घ काळात ते त्यांना पूर्ण करता आले नव्हते. आता तब्बल ६५ वर्षांनंतर हे चित्र साकारले आहे. या चित्रात ५० हून अधिक मानवाकृती आहेत. याविषयी देसाई सांगतात, ‘संगीत हे निसर्गातून आले आहे. निसर्गातील विविध घटकांचे आवाज म्हणजेच स्वर, हे स्वर विशिष्ट पद्धतीत बांधले की सूर निर्माण होतो, आणि या सुरांचेच संगीत होते. भगवान श्रीकृष्ण संगीताचे जनकच आहेत. त्यांना केंद्रभागी ठेवून सप्तसुर पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे दाखविले आहे.
संगीत हे पाण्यासारखे प्रवाही आहे. या सप्तसुरांची नदी झालेली दाखवून गोपिका त्याचा आनंद लुटत असून त्या सोबत त्या त्याचा प्रचारही करत असल्याचे चित्रातून साकारण्यात आले आहे.’ चित्राप्रमाणेच देसाई यांना संगीताचीही आवड आहे. या चित्राच्या माध्यमातून संगीताविषयीच्या भावना देसाई यांनी व्यक्त केल्या आहेत.
डोंबिवली, शर्मिला वाळुंज
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा