सुधीर फडके यांच्या सुरांनी शब्दांना सजवले तर अजय-अतुल यांनी त्याच सुरांना रसिकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवून दिले आहे. मन प्रकाशमान करणार संगीत म्हणजे लाइट व्होकल. दिग्गज कलाकारांच्या या दोन पिढीतला खेळ सुरांच्या साक्षीने शुक्रवारी सायंकाळी डोंबिवलीकरांनी अनुभवला. निमित्त होते डोंबिवली जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या जत्रेचे. या जत्रेत विविध कलेची जादू रसिकांनी अनुभवली. विजयराज बोधनकर यांनी चित्र रेखाटल्यानंतर सुधीर फडके ते अजय-अतुल यांच्या सांगीतिक प्रवासाची ही मैफल रंगली होती.
रवींद्र साठे, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, सावनी रवींद्र, प्रसन्नजीत कोसंबी, ऊर्मिला धनगर या कलाकारांनी आपल्या आवाजाने जणू काही रसिक प्रेक्षकांवर जादूच केली होती. वंद्य वंदे मातरम् हे गाणे सर्वानी एकत्रितपणे सादर केल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाट झाला. त्यानंतर प्रथमेश लघाटे याने इंद्रायणी काठी देवाची आळंदी आणि झाला महार पंढरीनाथ ही गाणी सादर केली. ही गाणी सादर झाल्यानंतर जणू काही सावळ्या पंढरीरायाची भेट झाल्याचा भासच रसिकांना झाला. प्रेम ही सगळ्यात उत्कट भावना असून प्रियकराचे घर कसे आहे हे सांगणारे त्या तिथे पलीकडे तिकडे हे ग.दि.मा. यांनी शब्दबद्ध केलेले व मालती पांडे यांनी गायलेले गाणे आर्या आंबेकर हिने तिच्या गोड गळ्यातून सादर केले. राजाच्या रंग महाली आणि अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले गोऱ्या गोऱ्या गालावरी हे गाणे ऊर्मिला धनगर आणि सावनी रवींद्रने सादर केले. त्यानंतर लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला या रवींद्र साठे यांनी गायलेल्या तसेच रानी माझ्या मल्यामंधी घुसशील का या गाण्यांनंतर रसिक डोंबिवलीकरांनी वन्समोर अशी दाद दिली. तर लावणी ही तर महाराष्ट्राची शान असून जणू काही ती मराठी भाषेचा चेहरा आहे. या वेळी मला लागली कोणाची उचकी तसेच उगवली शुक्राची चांदणी या लावण्या सादर करण्यात आल्या. या वेळी क्रिष्णा मुसळे आणि विजय जाधव यांनी खास शैहातील ढोलकी वाजवून रसिकांच्या शिट्टय़ा मिळवल्या. अभिनेत्री समिरा गुर्जर हिने केलेल्या खुमासदार शैलीतील निवेदनामुळे कार्यक्रमाला रंगत चढली होती. रसिक डोंबिवलीकरांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. या कार्यक्रमाला अभिनेते अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, संदीप पाठक यांनी हजेरी लावली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा