कल्याण – चार महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या जळगाव जिल्ह्यातील एका महिलेने कल्याणमध्ये सासरच्या घरी सासुच्या सततचा त्रास, हुंड्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी आणि त्याला मुंबई पोलीस दलात पोलीस असलेल्या पतीची साथ अशा अनेक कारणांमधून २४ वर्षाच्या विवाहितेने आपल्या कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी भागातील राहत्या घरी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
जागृती बारी असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. शोभा रामलाल बारी (सासू), सागर रामलाल बारी (पती) अशी आरोपींची नावे आहेत. हे कुटुंब कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी भागात राहते. मयत मुलगी ही जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पाणाचे गावातील वंदना गजानन वराडे यांची मुलगी होती. मुलगा पोलीस दलात असल्याने वराडे कुटुंंबीयांनी हे स्थळ पसंत केले. एप्रिल मध्ये भुसावळ येथे मोठ्या थाटात जागृतीचा विवाह सागर बरोबर लावून दिला. सोन्याचा ऐवज मुलाला देण्यात आला. तरीही जागृतीची आरोपी सासू शोभा हिने वराडे कुटुंबीयांना विवाहामध्ये सागरला तुम्ही रोख, सोन्याचा ऐवज दिला नाही. त्यामुळे आम्ही मुंबईत घर घेतले आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला दहा लाख रूपये द्या, अशी मागणी केली. आत्ताच लग्नाचा खर्च झाला आहे. त्यामुळे आम्ही एवढी रक्कम तात्काळ देऊ शकत नाहीत. नंतर थोडी फार रक्कम देऊ, असे वराडे कुटुंबीयांनी सांगितले. पण सासू शोभाला ते आवडले नाही.
हेही वाचा >>>डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांचा खडीच्या रस्त्यांवरून प्रवास; एमएमआरडीए, सार्वजनिक बांंधकाम विभागाचे दुर्लक्ष
शोभाने सून जागृतीला तू काळी आहेस. तू आम्हाला आवडत नाहीस, तू घरातून निघून जा, असे सतत बोलू लागली. या सततच्या त्रासाने जागृती हैराण झाली होती. हा प्रकार तिने आई, वडिलांंना कळवला होता. त्यांनी तिला व्यवस्थित होईल, शांत रहा असे सागितले होते. सासू शोभाचा त्रास वाढू लागल्याने जागृतीने शुक्रवारी राहत्या घरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी शोभा, सागर बारी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.