बलात्कारित महिलांच्या पुनर्वसनासाठी अनेक कायदे, योजना आल्या असल्या तरी त्याचा फायदा अशा पिडीत महिलांना होताना दिसत नाही. उलट जिच्यावर बलात्कार होतो तिलाच एका प्रकारे सामाजिक कैद सहन करावी लागते. अशीच एक अघोषित कैद अंबरनाथ शहरातील एक तरूणी गेल्या ५ वर्षांपासून अनुभवते आहे. ओळखीच्याच व्यक्तीने अल्पवयीन असताना केलेला बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार करून त्याची चित्रफित काढत समाज माध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे पीडित मुलीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले. समाजाची वाकडी नजर, टीका आणि टोमण्यांना घाबरून या तरूणीने गेल्या ५ वर्षात एकदा किंवा दोनदा घराचा उंबरठा ओलांडला आहे. त्यामुळे तिच्या अंधारमय भविष्याच्या चिंतेने तिच्या कुटुंबियांना ग्रासले आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने आपल्या कुटुंबियांना काहीसा आर्थिक आधार देण्यासाठी अंबरनाथमध्ये राहणाऱ्या या १६ वर्षीय तरूणीने उल्हासनगरच्या जीन्स कारखान्यात काम सुरू केले. अफजल मलिक असे या कंपनीच्या मालकाचे नाव होते. काही कारणास्तव मुलीने अजमल याची कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत काम स्विकारले. याचा राग मनात आल्याने अफजलने एके दिवशी तिला रस्त्यात गाठून फिरून येण्याच्या बहान्याने बदलापूरजवळील कोंडेश्वर परिसरात नेले. त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार केला. आरोपी अफजल मलिक याने अत्याचार करतानाची चित्रफित तयार केली.
बलात्कार प्रकरणातील आरोपी जामिनावर बाहेर
अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिल्यास ही चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली जाईल अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे मुलीने ही घटना घरी सांगितली नाही. मात्र, अजमलने ही चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली. शेजाऱ्यांपर्यंत ही चित्रफित पोहोचल्यानंतर एकच खळबळ उडाली. अखेर पीडितेने घरच्यांना याची माहिती दिल्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आरोपी अफजल विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याला अटक झाली. पोलीस कोठडीनंतर त्याला जामीनही मिळाला. सध्या आरोपी जामिनावर बाहेर आहे.
“पीडित तरूणीकडून जंतुनाशक औषध पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न”
या घटनेनंतर पीडित तरूणीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आहे. या घटनेच्या चित्रफितीनंतर काही शेजाऱ्यांनी तरूणीला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी तरूणीने जंतुनाशक औषध पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न केल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. घराबाहेर लोकांकडून टीका, टोमणे ऐकावे लागत असल्याने या तरूणीने गेल्या ५ वर्षात दोन ते तीन वेळाच घराचा उंबरठा ओलांडला आहे.
“चित्रफित इंटरनेटवरून काढून टाकून आमचे पुनर्वसन करा”
पाच वर्षांनंतरही पीडित तरूणी अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडू शकलेली नाही. ही चित्रफित इंटरनेटवरून काढून टाकून आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी पीडित तरूणी आणि तिच्या कुटुंबियांनी केली आहे. या प्रकारानंतर तरूणीचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. भविष्याच्या चिंतेने कुटुंबीय हवालदील झाले आहेत. बलात्कार जिच्यावर झाला तिलाच एक प्रकारची सामाजिक कोठडी सोसावी लागते आहे.
“पीडित मुलीचे पुनर्वसन करण्यात येईल”
“शासनाच्या मनोधैर्य योजने अंतर्गत संबंधित पीडित मुलीचे पुनर्वसन करण्यात येईल. यासाठी मुलीचे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागातर्फे समुपदेशन करण्यात येईल. तसेच आर्थिक सहाय्य्यही करण्यात येईल,” अशी माहिती ठाण्याचे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.