कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत हातगाडी, मंचकावर उसांचे चरखे लावण्यात येत आहेत. हे चरखे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे. पालिका, वाहतूक पोलिसांनी या चरख्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक, प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
कडक उन्हाळ्यामुळे अलीकडे पादचारी उस, लिंबू रस, थंड पेय पिण्यावर भर देत आहेत. उसाच्या थंडगार रसाला नागरिकांची सर्वाधिक पसंती आहे. रस्तारस्ती हातगाड्यांंवर, मंचक, ठेल्यांवर उसाचे चरखे ठेऊन त्यावर चरखे चालक व्यवसाय करत आहेत. या चरख्याच्या बाजुला बर्फ ठेवण्यासाठी जागा केली जाते. बर्फ वितळू नये म्हणून भाताच्या तुसामध्ये बर्फ ठेवला जातो. बर्फ ठेवण्यासाठी रस्त्याचा काही भाग व्यापला जातो. कल्याण, डोंबिवली शहरात अनेक भागात, मुख्य वर्दळीचे रस्ते, अंतर्गत गल्ली बोळात हे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी हे उसाचे चरखे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
काही जागरूक याविषयी पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये तक्रारी करत आहेत. त्याची दखल घेतली जात नसल्याच्या नागरिकांंच्या तक्रारी आहेत. कल्याण पूर्वेत पुना लिंक रस्त्यावर लोकग्रामकडे जाणाऱ्या रस्त्यावर उसाचे तीन चरखे आहेत. हे रस्ते वर्दळीच्या रस्त्यावर असल्याने त्यांच्यावर कारवाईची नागरिकांची मागणी आहे. पालिकेच्या जे प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने यापूर्वी हे पथके हटविले होते. परंतु, एका निलंबित कामगाराच्या आशीर्वादाने हे चरखे पुन्हा सुरू करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.
कल्याण पूर्वेतील शिवाजी काॅलनी रस्ता, नुतन ज्ञान मंदिर रस्ता, काटेमानिवली नाका, वालधुनी उड्डाण पूल, पश्चिमत संतोषी माता मंदिर, मुरबाड रस्ता, लालचौकी, रेल्वे स्थानक परिसर, डोंबिवलीत महात्मा फुले रस्ता, सुभाषचंद्र बोस रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, मानपाडा रस्ता, दिनदयाळ रस्ता, आयरे रस्ता, पाथर्ली रस्ता, एमआयडीसी निवासी, औद्योगिक विभागात चरखे चालक रस्ते अडवून व्यवसाय करत आहेत.
संध्याकाळी सात वाजल्यानंतर या चरखे चालकांना काही दुकानदार वीज पुरवठा देतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे चरखे सुरू असतात. दुकान मालक या चरखे चालकांकडून १५० ते २०० रूपये महिना विजेच्या वापराचे शुल्क वसुल करतात, असे एका माहितगाराने सांगितले. या चरखे चालकांवर पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याविषयी कल्याण मधील जागरूक नागरिक आनंद गायकवाड, डोंबिवलीत रिक्षा संघटनेचे शेखर जोशी यांनी पालिकेत तक्रारी केल्या आहेत.
पालिका अधिकाऱ्याने मात्र आमची फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू आहे. रस्ते अडवून चरखे चालक व्यवसाय करत असतील तर त्यांच्या हातगाड्या, उस चरखा यंत्र जप्त केले जात आहे, असे सांगितले.