कल्याण- येथील पश्चिम भागातील रामबाग चिकणघर मध्ये राहत असलेल्या एका रहिवाशाने एका वित्तीय संस्थेकडून तीन वर्षापूर्वी १५ लाखाचे घरासाठी कर्ज घेतले होते. या कर्जदाराने कर्जाची वेळेत परतफेड केली नाही. कर्जाची रक्कम वाढत जाऊन १७ लाख ५८ हजार झाली. वित्तीय संस्थेने महसुल विभागाच्या माध्यमातून त्याच्या घरावर जप्तीची कारवाई सुरू केली. पण,त्याने घरात विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या रहिवाशावर कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जप्तीची कारवाईसाठी गेलेले पथक घरात असताना या रहिवाशाने घराच्या शय्या खोलीत जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. जप्ती पथकाने आपल्या वाहनातून तातडीने रहिवाशाला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी त्याच्याविरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात महसूल विभागाचे चिकणघर भागाचे तलाठी प्रशांत चौगुले यांनी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी श्याम सांगवे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, कल्याण मधील रामबाग भागात राहणारे श्याम सांगवे, त्यांची पत्नी अश्विनी यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील इक्विटास स्माॅल फायनान्स संस्थेकडून १५ लाखाचे गृह कर्ज घेतले होते. वेळेत कर्जाचे हप्ते सांगवे दाम्पत्याकडून फेडले जात नव्हते. कर्जाची रक्कम व्याजासह १७ लाख ५८ हजार झाली. इक्विटास वित्तीय संस्थेने सांगवे यांच्याकडील कर्ज वसुलीसाठी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्याकडे दोन वर्षापूर्वी दावा दाखल केला. कर्जदार सांगवे यांच्याकडून कर्ज रक्कम वसूल होण्याची चिन्हे नसल्याने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी परदेशी यांनी कल्याणचे तहसीलदार जयराम देशमुख यांना श्याम सांगवे यांची सदनिका जप्तीची कारवाई करण्याचे आदेश मार्चमध्ये दिले. दोन महिन्याच्या कालावधीत तहसीलदार देशमुख यांनी नोटिसा पाठविणे, पोलीस बंदोबस्त या जप्तीच्या कारवाईच्या प्रक्रिया केल्या. सांगवे यांच्याकडून त्यास प्रतिसाद मिळत नव्हता.
हेही वाचा >>>“शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी आली पण…”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान
हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमामुळे ठाण्यात कोंडी
जून मध्ये तत्कालीन तलाठी वैभव झापडे यांनी जप्तीची कारवाई सुरू केली. सांगवे यांनी वित्तीय संस्थेला मी वेळेत कर्जफेड करतो, असे लेखी पत्र दिले. त्यामुळे जप्तीची कारवाई थांबविण्यात आली. झापडे यांची बदली झाल्याने कारवाईची जबाबदारी चिकणघरचे नवनियुक्त तलाठी प्रशांत चौगुले यांच्याकडे आली. सांगवे इक्विटास कंपनीची दिशाभूल करत असल्याने बुधवारी दुपारी तलाठी चौगुले, इक्विटास संस्थेचे रोशन जमदारे, आलेख देवरे, हवालदार निकाळजे, भाट हे सांगवे यांच्या रामबाग मधील घरी जप्ती कारवाईसाठी गेले. सांगवे यांनी पथकाला प्रवेशव्दारात अडवून दमदाटी करत कारवाई करण्यापासून रोखले. सांगवे पथकाला धक्का मारून मागे ढकलले आणि त्यानंतर त्यांनी घराची कडी आतून लावून घेतली. आतील कडी काढून पथकाने घरात प्रवेश केला. तेथे पाच महिला, दोन पुरुष बसले होते. महिलांनी हे घर आम्ही विकत घेतले आहे असे पथकाला सांगितले. ही बोलाचाली सुरू असताना श्याम सांगवे यांनी शय्यागृहात प्रवेश केला. तेथील बायोफिट विषारी द्रव्य पिऊन ते जमिनीवर कोसळले. सांगवे खोलीतून बाहेर येत नाही म्हणून एका महिलेने आत डोकावले. त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला. आजुबाजुला विषारी द्रव्य सांडले होते. जप्ती पथकाने श्याम सांगवे यांना स्वताच्या वाहनामध्ये घेऊन पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात तातडीने नेले.
कारवाईसाठी आलेल्या पथकाच्या जप्ती कारवाई अडथळा आणला. तसेच कारवाईसाठी सहकार्य न करता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्या बद्दल तलाठी प्रशांत चौगुले यांच्या तक्रारीवरुन महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी श्याम सांगवे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.