कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात बुधवारी रात्री तरुणाने एका अल्पवयीन मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या केली. या घटनेनंतर त्याने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आदित्य कांबळे (२०) असे आरोपीचे नाव आहे.
आदित्य हा बुधवारी रात्री ही मुलगी राहत असलेल्या दुर्गा देवी सोसायटीच्या परिसरात दबा धरून बसला होता. मुलगी तिच्या आईसोबत शिकवणी वर्गावरून येत होती. त्या वेळी आदित्यने पाठीमागून येऊन मुलीच्या आईला जोरात बाजूला ढकलले. त्यानंतर मुलीच्या छातीवर धारदार चाकूने आठ वार करून तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर आदित्यला रहिवाशांनी पकडून ठेवले होते. त्याच वेळी त्याने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. ती त्याच्याशी बोलत नव्हती. या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले आहे.