ठाणे : नितीन कंपनी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानालगत असलेल्या लँडमार्क या इमारतीत एका १३ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला आहे. याप्रकरणाची नोंद वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>> डोंबिवलीत उद्यापासून राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन, रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील नितीन कंपनी चौकाजवळ निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या आवारातच लँडमार्क ही इमारतही आहे. या इमारतीत १३ वर्षीय मुलगी तिच्या आजीसोबत राहत होती. बुधवारी रात्री शयनगृहात असताना तिने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येपूर्वी या मुलीने कोणतीही चिठ्ठी लिहीली नव्हती. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.