कल्याण – कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराचे फलक काही अज्ञात इसमांनी फाडून टाकले आहेत. याप्रकरणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
प्रचाराच्या वीस दिवसांच्या कालावधीत प्रथमच अशाप्रकारचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भाजप नेते, पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांनी सांगितले, मलंंगगड भागात महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या निवडणूक प्रचाराचे फलक चार ते पाच ठिकाणी अज्ञात इसमांनी फाडले आहेत. प्रत्येक उमेदवाराने आपल्या ताकदीने आणि स्पर्धा करून प्रचार करावा. फलक फाडून स्पर्धक उमेदवार आपली पातळी दाखवून देत आहेत. सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराला कल्याण पूर्वेसह मलंगगड परिसरातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे सर्व प्रचाराचे चित्र पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते फलक फाडण्यासारखे प्रकार करत आहेत.
फलक फाडणे ही काही मोठी मर्दुमकी नाही. आम्ही फलकांपेक्षा नागरिकांना अधिकाधिक भविष्यवेधी विकास कामे कशी देता येतील या विचारातून प्रचार करत आहोत, असे अभिमन्यू गायकवाड यांनी सांगितले.