कल्याण – कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी सतराव्या फेरीपर्यंत 55 हजारहून अधिक मते घेऊन विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.
सुलभा गायकवाड यांना कडव्या आणि तगड्या स्पर्धक उमेदवारांपेक्षा मिळालेल्या मिळालेला मतांवरून मतदारांनी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे सेनेचे तत्कालीन शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराकडे दुर्लक्ष करून गणपत गायकवाड कुटुंबीयांनाच निवडणुकीत साथ दिल्याचे चित्र आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाड नागरिकांच्या मनातून उतरले असे सुरुवातीचे चित्र होते. पण विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर मतदारांनी आम्ही गणपत गायकवाड यांच्या कुटुंबियांच्याच मागे असल्याचे दाखवून दिले आहे.
मागील पंधरा वर्षापासून गणपत गायकवाड कल्याण पूर्वेचे आमदार म्हणून विधानसभेत नेतृत्व करत आहेत. विकास कामांबरोबर कल्याण पूर्व येथील नागरिकांबरोबर त्यांनी आपले स्नेहसंबंध सांभाळून ठेवले आहेत. शांत आणि संयमित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
हेही वाचा >>>मुरबाडमध्ये कथोरेंनी चक्रव्युव्ह भेदले, ५० हजारांहून अधिक मतांची विजयी आघाडी
महेश गायकवाड यांनी त्यांना वेळोवेळी आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे आणि आपल्या कल्याण पूर्व येथील सत्ता स्थानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न चालवल्याबद्दल त्यानंतर घडलेल्या घटनांमधून आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता.
गोळीबाराच्या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या घरात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही असे प्रारंभीचे चित्र होते. परंतु भाजपला आपली प्रत्येक उमेदवारी महत्त्वाची वाटल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गणपत गायकवाड यांच्या घरातच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामधूनच सुलभा गायकवाड यांची उमेदवारी पक्की झाली.
आपल्यावर गोळीबार करूनही महायुतीने कल्याण पूर्वे मध्ये भाजपच्या सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने संतप्त झालेल्या महेश गायकवाड यांनी शिंदे सेनेतून बंडखोरी करून अपक्ष म्हणून सुलभा यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारीला पडद्यामागून शिंदे सेनेतील काही बलवान नेत्यांची ताकद असल्याची चर्चा होती.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आनंदोत्सव; कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी
भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने सुरुवातीला सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध करणारे शिंदे सेनेतील नाराज कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सामील झाले. सुलभा गायकवाड यांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून समन्वयाने प्रचारात जोरदार आघाडी उघडली.
मी तुमच्या घरातील एक कौटुंबिक सदस्य आहे. आपण सर्व मतदार माझे भाऊ, ननंद एक सदस्य आहात अशी साद घालून सुलभा गायकवाड यांनी मतदारांना आपलेसे केले. एक महिला म्हणून आपण सुलभा गायकवाड यांना कधीही भेटून आपल्या नागरी समस्या आणि इतर मागण्या करू शकतो असा विचार महिलांनी करून त्याला भरभरून साथ दिली.
आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे तुरुंगात आहेत. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीतही महायुती नेते पदाधिकाऱ्यांच्या साथीने सुलभा गायकवाड यांनी प्रचारात मुसंडी मारून मतांमध्ये आघाडी घेऊन कल्याण पूर्वेवरील भाजपसह गणपत गायकवाड यांची हुकमत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे