कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खंदे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने शिंदे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

आठ महिन्यापूर्वी उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात जमीन वादाचे प्रकरण, माजी आ. गणपत गायकवाड यांच्यासमोर त्यांच्या मुलाला शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थकांनी केलेली धक्काबुक्की यामुळे संतप्त झालेल्या माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या समर्थकावर गोळीबार केल्याने खासदार डाॅ. शिंदे अस्वस्थ झाले होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा वरचष्मा पाहिजे म्हणून खा. डाॅ. शिंदे यांच्या पाठबळामुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात मागील दोन वर्षापासून शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी आपणच यापुढे कल्याण पूर्वेचा आमदार अशा थाटात जोमाने काम सुरू केले होते. या सगळ्या हालचालींना खासदार शिंदे यांची फूस असल्याने माजी आमदार गणपत गायकवाड खासदार शिंदे यांच्या कार्यपध्दतीवर नाराज होते.

कल्याण पूर्वेतील गणपत गायकवाड यांच्या कामात शहरप्रमुख महेश यांचा हस्तक्षेप वाढल्याने गणपत गायकवाड यांच्यामध्ये अस्वस्थता होती. याविषयी गणपत गायकवाड यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेतली जात नव्हती. दरम्यानच्या काळात गणपत गायकवाड यांनी शिंदे पिता-पुत्रांवर व्यवसायातील आर्थिक व्यवहारांवरून आरोपसत्र सुरू केले होते.

हेही वाचा…उल्हासनगरचे कुमार आयलानी वेटिंगवर, पहिल्या यादीत आयलानी यांना उमेदवारी नाहीच

गणपत गायकवाड यांच्या १५ वर्षाच्या काळात कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ विकासापासून दूर गेला. या मतदारसंघाचे शोषण झाले, अशी विधाने महेश गायकवाड यांनी सुरू केली होती. त्यामुळे गणपत गायकवाड आणि महेश यांच्यातील दरी वाढत गेली. गोळीबार प्रकरणामुळे दोघांमधील वाद अधिकच चिघळला. या प्रकरणामुळे गणपत गायकवाड यांना अटक झाली. ते आता तुरूंगात आहेत.

आरोपी असल्याने गणपत यांना उमेदवारी मिळणार नाही असा विचार करून महेश यांनी कल्याण पूर्वमधील लोकांची सहानुभूति मिळवून आपले प्रचार कार्य सुरू केले होते. दोन दिवसापूर्वी महेश यांनी भाजपने कोणीही उमेदवार दिला तरी आपण त्यांचा प्रचार करू, पण गणपत गायकवाड यांच्या कुटुंबीयांमध्ये उमेदवारी दिली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, असा इशारा दिला आहे. महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्याने महेश गायकवाड समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता महेश काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

हेही वाचा…ठाणे मतदारसंघ भाजपकडेच, आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी

पती माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पंधरा वर्षात कल्याण पूर्वेत अनेक विकासाची कामे केली आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते तुरुंगात असले तरी त्यांच्या आशीर्वाद, भाजप, शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सहकार्याने ही निवडणूक आपण मोठ्या मताधिक्याने जिंकू.

सुलभा गायकवाड महायुतीच्या उमेदवार, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ.

कल्याण पूर्वमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून शिवसेना सुलभा गायकवाड यांच्या विजयासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील. याठिकाणी महायुती धर्म पाळला जाईल. महेश गायकवाड यांनी काही भूमिका घेतली तर याविषयी पक्षाचे ज्येष्ठ निर्णय घेतील. राजेश कदम उपजिल्हाप्रमुख,शिवसेना.