पक्षीप्रेमींना अप्रूप असते ते पक्ष्यांच्या निरीक्षणाचे. एखादा विशिष्ट जातीचा पक्षी निदर्शनास आला की या पक्ष्याचा इतिहास शोधायचा, त्यांच्या सवयी जाणून घ्यायच्या आणि या पक्ष्याला आपलेसे करायचे हे पक्षीप्रेमींचे आवडते काम. भारतीय पक्ष्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजाती असल्या तरी परदेशी पक्ष्यांचे आकर्षण पक्षीप्रेमींमध्ये काही औरच असते. भारतात पोपट या जातीमध्ये शरीराने हिरवा आणि लाल चोच असलेला पोपटच सर्वाधिक प्रिय आहे. कायद्यानुसार भारतीय पोपटाला पाळता येत नसले तरी परदेशी पक्ष्यांना घरात पाळण्यासाठी कोणतेही बंधन नाही. याच कारणाने भारतातही वेगवेगळ्या परदेशी पोपटाच्या जातींना आपलेसे करण्यात आले. दक्षिण अमेरिकेत आढळलेल्या सन कनूर या पोपटाने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. अठराव्या शतकापासून दक्षिण अमेरिकेतील जंगलात या पक्ष्याचे वास्तव्य आढळले. वेगवेगळ्या आकर्षक रंगात आढळत असल्याने सन कनूर पोपटाने आपल्या रूपामुळे पक्षीमित्रांना भुरळ घातली आहे. सन कनूर या पोपटाला पाहताच क्षणी त्याच्या शरीरावरील गडद रंगीबेरंगी रंगाचे निरीक्षण करावेसे वाटते. या पोपटाच्या बाबतीत विशेष म्हणजे कळपात राहणारे पोपट अशी सन कनूर यांची ओळख आहे. विशेषत: पोपट म्हटले की पिंजऱ्यात एकटे किंवा जोडी पाहायला मिळते. सन कनूर पोपट मात्र जंगलात कळपाने राहतात. अलीकडे या पक्ष्यांच्या आकर्षक रंगांमुळे परदेशात मोठय़ा प्रमाणात या पोपटांचे पालन केले जाते. कॅप्टिव्हिटीमध्ये या पोपटांचे ब्रीडिंग अलीकडे होत असल्याने आणि आकर्षक रंगामुळे या पोपटांची मागणी वाढलेली दिसते. सध्या कॅप्टिव्हिटीमध्ये या पोपटांचे ब्रीडिंग होत असल्याने दक्षिण अमेरिकेतील जंगलातून दुर्मिळ होत जाणारा पक्षी असे सन कनूरबद्दल बोलले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा