ठाणे : गेल्या दोन वर्षांपासून वेतन मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्या कामगारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्या लवकरच सोडवू असे आश्वासन दिले. यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे येथील तीन हात नाका परिसरात ६० ते ७० वर्षांपासून सुपरमॅक्स कंपनी आहे. या कंपनीत दाढी करण्यासाठी लागणारे ब्लेड तयार करण्यात येते. या कंपनीत सुमारे दीड हजारांच्या आसपास कामगार कार्यरत आहेत. २०२२ साली कंपनी व्यवस्थापनाने कंपनी चालवू शकत नसल्याचे कारण पुढे करत अचानकपणे कंपनी बंद केली.

हेही वाचा >>> डोंबिवलीचं ‘धगधगतं’ वास्तव; टाईमबॉम्बच्या वातीवर वसलेलं शहर!

यासंदर्भात, व्यवस्थापकाकडून कोणतीही अधिकृतरीत्या सूचना देण्यात आली नसल्याचा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे. कंपनी बंद झाली असली तरी, तुम्हाला वेतन दिले जाईल असे आश्वासन कंपनी व्यवस्थापकांकडून कामगारांना देण्यात आले होते.

परंतु, कामगारांना वेतन मिळत नसल्यामुळे त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन केले.

कुटुंबावर उपासमारीची वेळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्या कामगारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर या समस्या लवकरच सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले आणि यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले. गेल्या दोन वर्षांपासून वेतन मिळत नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले. अनेक कामगार हे कर्जबाजारी झाले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supermax company workers protest outside the cm eknath shinde s residence in thane zws