झटपट श्रीमंत होणे आणि अचानक धनलाभ व्हावा यासाठी काही जणांनी कल्याण पूर्वेत निर्जन ठिकाणी अंधश्रध्दे मधून भोंदू बाबांचे सहकार्य घेऊन कासवाची पूजा सुरू केली होती. एका लाल कपड्यावर कासवाला ठेऊन पूजा सुरू असतानाच, काही जागरुक नागरिकांनी हा प्रकार पाहून भोंदू बाबाला जाब विचारण्यास सुरुवात केली. आता आपले पितळ उघडे पडेल, या भीतीने भोंदूने घटना स्थळावरुन पळ काढला. सोमवारी हा प्रकार कल्याण पूर्वेत घडला आहे.
हेही वाचा >>> कल्याण : वाहतूक पोलिसाला ठोकर देणाऱ्या दुचाकी स्वाराला दोन वर्षाचा कारावास
पूजेच्या ठिकाणी ठेवलेले कासव नागरिकांनी प्राणी मित्र संघटनेच्या ताब्यात दिले. या संघटनेने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कासव ताब्यात दिले. त्यांनी त्याला त्याचा अधिवास असलेल्या सुरक्षित ठिकाणी सोडले.कल्याण पूर्वेतील साकेत महाविद्यालय रस्त्यावरील झुडपांच्या मध्ये निर्जन ठिकाणी काही जण झटपट श्रीमंत होण्यासाठी एका भोंदू बाबाला हाताशी धरुन एका कासवाची पूजा करत होते.
हेही वाचा >>> भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्त्याच्या ५६१ कोटींच्या वाढीव खर्चास मान्यता
या रस्त्यावरुन जात असलेल्या काही जागरुक पादचाऱ्यांना संशय आला. त्यांना झुडपांच्या मधून अगरबत्ती, उदाचा धूर येत असल्याचे दिसले.. लाल कपड्यावर कासव ठेऊन त्याची पूजा केली जात असल्याचे दिसले. याठिकाणी काही तरी अघोरी कृत्य सुरू आहे असा संशय आल्याने जागरूक पादचारी जादूटोणा सुरू असल्याच्या ठिकाणी गेले. त्यांनी हा काय प्रकार सुरू आहे अशी विचारणा भोंदू बाबा आणि तेथे जमलेल्या तरुणांकडे केली. त्यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी आम्ही हा प्रकार करत आहोत अशी माहिती दिली. अंधश्रध्देला बळी पडून तरुण अघोरी कृत्य करत असल्याचे समजल्यावर जागरुक पादचाऱ्यांनी पोलिसांना बोलविण्याची हालचाल केली. ही कुणकुण लागताच तरुणांसह भोंदु बाबाने तेथून पळ काढला.
ही माहिती प्राणी मित्र संघटनेला देण्यात आली. या संघटनेचे प्रेम आहेर घटनास्थळी आले. त्यांनी पुजेसाठी ठेवलेले कासव ताब्यात घेतले. ते वन विभागाच्या ताब्यात दिले. गेल्या अनेक महिन्यांपासून डोंबिवली, कल्याण भागात कासवांची चोऱ्या मार्गाने तस्करी केली जात आहे. जादुटोण्यासाठी कासवांचा वापर केला जात असल्याने पोलीस आता सतर्क झाले आहेत.
पोलिसांनी अशा घटनांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अंधश्रध्देला बळी न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अशा अघोरी घटना कोणाला कुठे आढळल्यास समितीशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.