लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना महावितरणकडून घरगुती दराने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कल्याण, डोंबिवली, वसई, पालघर विभागातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढे यावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
गणेशोत्सव काळात अनेक गणेशोत्सव मंडळे रस्त्यावरील विजेच्या खांबावरुन चोरुन वीज गणपती प्रतिष्ठापनेच्या मंडपात घेतात. यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होते. याशिवाय चोरुन वीज घेताना काही दुर्घटना घडली तर नवीन प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महावितरणच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधून गणेशोत्सवासाठी अधिकृत वीज पुरवठा घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
हेही वाचा… डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील पाटकर रस्त्यावरील स्कायवॉकखाली दुचाकींचा बेकायदा वाहनतळ
गणेशोत्सव मंडळांना गणपती उत्सावाच्या कालावधीपुरता हा तात्पुरता वीज पुरवठा देण्यात येईल. हा वीज पुरवठा घेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र, पालिकेची मंडप परवानगी, पोलिसांचा परवाना, विदयुत निरीक्षक यांचे वीज संच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेले पासबुक नक्कल प्रतींसह दाखल करणे आवश्यक आहे. अटी शर्तींची पूर्तता न करणाऱ्यांना वीज पुरवठा देण्यात येणार नाही, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हेही वाचा… डोंबिवलीत रक्षाबंधनासाठी गेलेल्या कुटुंबीयांचे घर लुटले
गणेशोत्सव काळात विद्युत रोषणाई करताना रस्त्या लगतच्या रोहित्राला, जिवंत वीज वाहिन्यांना धक्का पोहचणार नाही, अशी कोणतीही कृती मंडळ कार्यकर्त्यांनी करू नये. अनेक ठिकाणी बांबूला वीज वाहिन्या बांधून रात्रीच्या वेळेत वीज पुरवठा सुरू केला जातो. हे प्रकार टाळावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी २४ तास सेवा देणाऱ्या १९१२, १८००२१२३४३५ येथे संपर्क साधावा.