ठाणे : जिल्ह्यातील शहापूर येथील वरस्कोळ ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गणेश राठोड यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. प्रलंबित कामासंदर्भात पत्र देण्याकरिता लाचेची रक्कम स्विकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
शहापूर येथील पंडित नाका परिसरात सुरेश गणेश राठोड (४१) हे राहतात. ते शहापूर येथील वरस्कोळ ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम पाहतात. तक्रारदाराला प्रलंबित कामासंदर्भात पत्र देण्याकरिता सुरेश यांनी त्याच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १ जानेवारीला तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिस अधिक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने २ जानेवारीला तक्रारीची पडताळणी केली.
हेही वाचा…ठाणे भाईंदर प्रकल्प लवकरच मार्गी, ‘एमएमआरडीए’च्या एकत्रित निविदेला पाच कंपन्यांचा प्रतिसाद
त्यामध्ये प्रलंबित कामासंदर्भात पत्र देण्यासाठी सुरेश यांनी ५ हजारांची मागणी करून तडजोडीअंती ३ हजाराची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याचे समोर आले. यानंतर ३ जानेवारीला पोलिसांच्या पथकाने सापळा रचून सुरेश यांना तक्रारदाराकडून ३ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.