राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख पदाचा काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिलेले सुरेश म्हात्रे ( बाळ्यामामा) यांनी गुरुवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा यापूर्वी शिवसेना, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास राहिला असून त्यांनी आता पुन्हा सत्ते असलेल्या पक्षात प्रवेश केल्याचे चित्र आहे. एकेकाळी शिवसेनेत असताना त्यांनी स्थानिक भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. परंतु आता राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा- मीरा भाईंदरच्या माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वजनदार राजकारणी म्हणून सुरेश म्हात्रे ( बाळ्यामामा) यांची ओळख आहे. पंरतु ते सातत्याने पक्ष बदल असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला ते शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांनी २०१४ मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका शिवसेनेला मान्य नव्हती. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्यावर कारवाई केली.
हेही वाचा- पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
त्याअंतर्गत तब्बल दोन वर्ष सुरेश म्हात्रे निर्णयप्रक्रियेपासून दूर झाले. पक्षाकडून दुर्लक्षित झाल्याची भावना निर्माण झाल्याने ते कमालीचे नाराज झाले होते. यातूनच त्यांनी महाविकास आघाडी सत्तेवर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. पंरतु काही दिवसांपूर्वीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ते आता कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा सर्वत्र सुरू असतानाच, त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांची शिवसेनेकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी नियुक्तीचे हे पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले.
हेही वाचा- ठाण्यातील दडपशाहीविरोधात ठाकरे गटाचा इशारा
यावेळी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी आमदार अशोक पाटील, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के,शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील,शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर शहरप्रमुख आकाश सावंत आणि शिवसेनेचे मुरबाड-शहापूर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.