कल्याण : उल्हासनगरमधील केबल व्यावसायिक सच्चानंद करीरा यांची सात वर्षांपूर्वी कुख्यात गुंड सुरेश पुजारी याच्या हस्तकाने हत्या केली होती. या हत्येच्या तपासासाठी उल्हासनगर पोलिसांना पुजारीचा ताबा हवा होता. गुरुवारी त्याचा ताबा मुंबई पोलिसांनी उल्हासनगर पोलिसांना दिला. पुजारीला उल्हासनगरमध्ये आणताच पोलीस ठाण्याभोवती विशेष पथकाची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
सुरेश पुजारी याच्यावर ठाणे, मुंबई परिसरात एकूण २४ गुन्हे दाखल आहेत. १५ गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलीस आयुक्तालय, सात गुन्ह्यांची नोंद ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस ठाण्यांमध्ये आहे. खंडणी, हत्या, दहशत अशा प्रकारचे हे गुन्हे आहेत. केबल व्यावसायिक करीरा याच्या हत्येप्रकरणी सुरेश पुजारीची चौकशी उल्हासनगरचे साहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड करीत आहेत. सच्चानंद करीरा हे उल्हासनगरमधील मोठे केबल व्यावसायिक होते. त्यांना खंडणीसाठी पुजारीच्या हस्तकांकडून त्रास दिला जात होता, धमक्या दिल्या जात होत्या. खंडणी मिळत नाही लक्षात आल्यावर पुजारीच्या हस्तकांनी सात वर्षांपूर्वी त्यांची उल्हासनगर पूर्वेतील गोलमैदान येथील त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी नितीन अवघडे याला अटक केली होती. त्याच्या साक्षीतून या प्रकरणात सुरेश पुजारीचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. तेव्हापासून पोलीस पुजारीच्या मागावर होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई, उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, विशेष सुरक्षा पथकाच्या गराडय़ात गुरुवारी दुपारी पुजारीला उल्हासनगरमध्ये आणण्यात आले. राज्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये पुजारी पोलिसांना हवा होता. पंधरा वर्षांपासून तो विदेशात फरार होता. पुजारी विदेशात असला तरी त्याच्या नावाने हस्तकांकडून खंडणीसाठी धमक्या दिल्या जात होत्या. तो अटक झाल्यापासून मात्र त्याच्या टोळीचे काम थंडावले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा