सुरतमधील प्रसिद्ध घोटाला हा पदार्थ आता मीरा रोडमध्येही मिळू लागला आहे. सिल्वर पार्क येथील ‘सुरती घोटाला’ या ठिकाणी हे पदार्थ मिळतात. अंडय़ापासून बनवलेले विविध ६० प्रकारचे पदार्थ खवय्यांची रसना तृप्त करतात.
काशिमीरा ते भाईंदर या मुख्य रस्त्यावरून गोल्डन नेस्टच्या दिशेने येताना सिल्वर पार्कचा सिग्नल पार केला की डाव्या बाजूला एका दुकानावर ‘सुरती घोटाला’ असे लिहिलेला फलक नजरेस पडतो. सुरती म्हटले की खमण, ढोकळा, फरसाण असे गुजराती पदार्थ असणार, असा अंदाज लावत दुकानात शिरलात तर आपले अंदाज सपशेल खोटे ठरतात. कारण दुकानाच्या काऊंटरवरच मांडलेले अंडय़ाचे ढीग आपल्या नजरेस पडतात. अंडे म्हटले की अंडय़ाची बुर्जी, ऑम्लेट असे अंडय़ाचे दोन-तीन पदार्थच आपल्या डोळ्यासमेर तरळून जातात. परंतु अंडय़ापासून तब्बल ६० वेगवेगळे पदार्थ तयार होऊ शकतात, असे कोणी सांगितले तर आपला त्यावर पटकन विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे आणि अंडय़ाच्या या वेगवेगळ्या पद्धतीच्या डीशची चव चाखायची असेल तर मीरा रोडमधील ‘सुरती घोटाळा’ दुकानाला मात्र भेट द्यावीच लागेल.
अंडा बुर्जीच्या आणि ऑम्लेटच्या गाडय़ा आपल्याला नाक्यानाक्यावर दिसून येतात, परंतु येथे ‘एग खीमा घोटाला’, ‘सुरती एग करी’, ‘अंडा घोटाला’, ‘लचका’, ‘ऑस्टेलियन फ्राय’ अशी एकाहून एक आकर्षक नावे असलेल्या अंडय़ांपासून बनवलेले विविध लज्जतदार पदार्थ मिळतात. या पदार्थाची नावे ऐकूनच कुतूहल जागे होते आणि या पदार्थाचा आस्वाद घ्यावा असे वाटू लागते. उकडलेली अंडी, हाफफ्राय ऑम्लेट, चीज, लोणी आणि भारतीय मसाल्यांचा विविध प्रकारचा वापर आणि पदार्थ तयार करणाऱ्याचे कसब यातून तयार होतात अंडय़ाचे तब्बल साठ पदार्थ. सोबतीला खाण्यासाठी ब्रेड किंवा पाव आहेच.. या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी मीरा-भाईंदरच्या खवय्यांच्या अक्षरश: उडय़ा पडतात.
सुरती घोटाळा हा पदार्थ मुळचा सुरतचा. सुरतमधल्या रस्त्या रस्त्यावर हे पदार्थ खवय्यांसाठी सहज उपलब्ध होतात. मुंबईत मात्र अद्याप हे पदार्थ म्हणावे तसे रुळलेले नाहीत. सुरती घोटाळ्याचे मुंबईतले पहिले केंद्र १२ वर्षांपूर्वी मीरा रोड येथे सुरू झाले. मनीष मेहरा यांनी हे केंद्र सुरू केले. आज मुंबई, ठाणे, भिवंडी आदी ठिकाणचे ग्राहक आवर्जून या पदार्थाची लज्जत चाखण्यासाठी या ठिकाणी येत असतात. एरवी अंडय़ाचा वापर सकाळच्या न्याहारीसाठी केला जात असला तरी रोजच्या जेवणाला पर्याय म्हणूनही सुरती घोटाळा या डीशला पसंती मिळत आहे. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ याप्रमाणेच अंडय़ापासून बनवलेले विविध पदार्थ खाण्यासाठी या ठिकाणी दररोज जायला काय हरकत आहे!
सुरती घोटाला
- शॉप क्र. २४, चंद्रेश अॅकॉर्ड बिल्डिंग, मीरा-भाईंदर रोड, सिल्वर पार्क, मीरा रोड (पूर्व)