बदलापूरः कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कचराभूमीवर प्रस्तावीत असलेल्या अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहराच्या संयुक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र काही स्थानिकांनी या सर्वेक्षणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोध करणाऱ्यांविरूद्ध बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वेक्षणानंतर येत्या नऊ महिन्यात प्रकल्प मार्गी लागण्याची आशा आहे.
गेल्या काही वर्षात ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांचा कचराप्रश्न गंभीर झाला आहे. कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने वर्षानूवर्षे कचराभूमीच्या शेजारी दुर्गंधी, कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार होत होते. अंबरनाथ आणि उल्हासनगर शहराची ही कचराभूमीची समस्या गंभीर बनली होती. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांचा संयुक्त घनकचरा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वालिवली येथील कचराभूमीवर यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा, निधीची तजवीज आणि जागेचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर या प्रकल्पाच्या उभारणीला वेग आला. नुकतीच या कामासाठी कंपनीला कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यानंतर या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीसाठी बदलापुरच्या कचराभूमीवर सर्वेक्षण करण्यात आले. या प्रकल्पासाठी आवश्यक जागेची पाहणी आणि सर्वेक्षण करण्यात आले.
हेही वाचा… ठाण्यात पाणी वितरण सुधारणा प्रकल्प खर्चात वाढ
मात्र सर्वेक्षण करण्यापूर्वीच स्थानिकांनी पुन्हा एकदा या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध केला. स्थानिकांनी येथे एकत्र येत प्रकल्पाच्या विरूद्ध घोषणाबाजी केली. पोलीसांच्या मध्यस्थीने त्यांची समजून काढून हे सर्वेक्षण करण्यात आले. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात नऊ जणांविरूद्ध पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
एकूण १४८ कोटी रूपये खर्चातून हा प्रकल्प उभारण्यात येत असून आर अँड बी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या नऊ महिन्यात प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. संरचना – बांधा – चालवा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर हा प्रकल्प राबवला जातो आहे.