ठाणे : डोंबिवलीतील अमुदान रासायनिक कंपनीतील स्फोटानंतर खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उशिरा का होईना अखेर डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणांतर्गत प्रत्येक रासायनिक कंपन्यांची तपासणी केली जात असून गॅस गळती, सांडपाणी त्याचे दुष्परिणाम आणि इतर संभाव्य धोक्यांबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे. या माहितीच्या आधारे त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती प्रदूषण मंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जितेंद्र आव्हाड महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन

जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी कारखान्यांचा संवर्गनिहाय तपशील जाहीर करण्यात येत असतो. यंदाच्या संवर्गनिहाय तपशिलामध्ये ठाणे जिल्ह्यात तब्बल २ हजार २९४ कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक हा ६० हून अधिक होता. यामध्ये कल्याण आणि डोंबिवली येथील कारखान्यांची संख्या ३०९ इतकी होती, तर ४१ ते ५९ इतका प्रदूषण निर्देशांक असलेल्या कारखान्यांची संख्या ७३ इतकी होती. यामुळे डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्याबरोबरच येथील कारखान्यांमधून निघणाऱ्या उत्सर्जित घटकांमुळे प्रदूषणाची समस्या देखील गंभीर असल्याचे समोर आले होते. तर याचेच दुष्परिणाम म्हणून डोंबिवली औद्याोगिक क्षेत्रातील रस्त्यांचा रंग गुलाबी होणे, नाल्याच्या पाण्याला दुर्गंधी येणे, हिरवा पाऊस पडणे यांसारख्या अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र यांनतर प्रदूषण मंडळाकडून हवी तशी कठोर कारवाई न झाल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त करण्यात आला होता.

डोंबिवलीत नुकताच अमुदान रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे या कारखान्यांचा सुरक्षा आणि त्यामुळे होणारे तीव्र प्रदूषण विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार येथील धोकादायक कारखान्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येणार आहे. तसेच संवर्गनिहाय या कारखान्यांची सविस्तर तपशील असलेली यादीदेखील करण्यात येत आहे.

सर्वेक्षणात परिणामांची नोंद

डोंबिवली औद्याोगिक क्षेत्रात सुमारे १०० हून अधिक धोकादायक रासायनिक कारखाने आहेत. यात स्फोट होणे, अथवा येथे गॅस गळती, कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रदूषण होणे यांसारख्या शक्यता आहेत. सर्वेक्षणांतर्गत रासायनिक कारखान्यातून निघणारा गॅस, सांडपाणी आणि त्यामुळे नागरिकांवर होणारे परिणाम याची नोंद घेतली जात आहे, अशी माहिती कल्याण प्रादेशिक प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी बी.एम.कुकडे यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survey of factories in dombivli midc area from maharashtra pollution control board zws
Show comments