लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा हवेचा स्तर खालावला असला तरी त्यालगतच्या ठाणे शहरातील हवा मात्र मध्यम प्रदुषित असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. शहरातील नौपाडा, कोपरी आणि वर्तकनगर भागात पालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने आठ दिवस हवेची गुणवत्ता तपासणी केली असून त्यात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२० ते १३८ इतका आढळून आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा हवेचा स्तर खालावला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील हवेचा स्तर खालावल्याने त्या शेजारीच असलेल्या ठाणे महापालिकेने शहरातील हवेच्या गुणवत्तेची पाहाणी केली आहे. २३ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. नौपाडा येथील महापालिका शाळा क्रमांक १९ आणि २०, वर्तकनगर येथील रेप्टाकॉस कंपनी परिसर, कोपरी येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ९ याठिकाणी पालिकेच्या पथकांनी हवा मोजणी यंत्राद्वारे हवेची गुणवत्ता तपासली आहे. यामध्ये नौपाडा येथील महापालिका शाळा क्रमांक १९ आणि २० या परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२० इतकी आढळून आली आहे. वर्तकनगर येथील रेप्टाकॉस कंपनी परिसर येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२४ इतकी तर, कोपरी येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ९ परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३८ इतकी असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये इतर दोन ठिकाणांच्या तुलनेत कोपरी परिसरात हवेची गुणवत्ता निर्देशांक जास्त असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी या तिन्ही ठिकाणची हवा मध्यम प्रदुषित गटात मोडत असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा-भिवंडीतील विकास आराखडा बदलण्यासाठी दलालांकडून प्रलोभने
धुळीकण प्रमाण
नौपाडा येथील महापालिका शाळा क्रमांक १९ आणि २० परिसरात धुळीकणाचे प्रमाण १३० आहे. वर्तकनगर येथील रेप्टाकॉस कंपनी परिसर येथे धुळीकणांचे प्रमाण १३५ तर, कोपरी येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ९ परिसरात धुळीकणाचे प्रमाण १५७ आढळून आले.
हवेचा गुणवत्ता निर्देशांक प्रमाण
हवा गुणवत्ता निर्देशांक | हवा गुणवत्ता |
०-५० | चांगला |
५१-१०० | समाधानकारक |
१०१-२०० | मध्यम |
२०१-३०० | प्रदुषित |
३००-४०० | अति प्रदुषित |
मुंबईच्या तुलनेत ठाणे शहरातील हवा कमी प्रदुषित आहे. ठाण्याची हवा मध्यम प्रदुषित आहे. बांधकाम प्रकल्प आणि वाहनांच्या वर्दळीमुळे हवा मध्यम प्रदुषित आहे. हे हवा प्रदुषण कमी करण्यासाठी विविध नियंत्रण उपाययोजना करण्यात येत आहेत. -मनिषा प्रधान, ठाणे प्रदुषण नियंत्रण अधिकारी