ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला असून त्यापाठोपाठ बाळासाहेबांच्या शिवसेनेने रविवारी ठाण्यात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे, माजी आमदार योगेश पाटील आणि ठाकरे गटासह विविध पक्षातील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या तीन महिन्यांपासून किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा होत्या. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे. किर्तीकर यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला असतानाच, रविवारी शिंदे गटाने रविवारी ठाण्यातील टेंभीनाका येथील आंनद मठात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे, माजी आमदार योगेश पाटील, ठाकरे गटासह विविध पक्षातील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी धक्का दिला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हे सरकार असल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया वैजनाथ वाघमारे यांनी दिली. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला.

विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी लढणारी स्त्री”

दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश रखडला ?
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि त्याआधीही दीपाली सय्यद प्रचंड सक्रीय झाल्याचं चित्र दिसत होते. अनकेदा त्यांनी विरोधकांवर जाहीरपणे टीका केली असून, सडेतोड उत्तरही दिले. ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठीही त्या प्रयत्न करत होत्या. पण पक्षात सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत. त्या नाराज असल्याने शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असतानाच, त्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचा प्रवेश झालाच नाही. दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने भाजप महिला मोर्चाने त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध केला आहे. त्यांनी आधी पंतप्रधान मोदी यांची माफी मागावी अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या ठाणे शहराध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी केली आहे. भाजपच्या विरोधामुळेच तर ऐनवेळेस दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश तर रद्द झाला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare estranged husband vaijnath waghmare entry into balasaheb shiv sena eknath shinde thane news tmb 01