कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण पूर्व जे प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील पथक प्रमुख भगवान पाटील हे मागील अनेक वर्ष फेरीवाला हटाव पथकात कार्यरत आहेत. ते ज्या प्रभागात काम करतात. त्या प्रभागात त्यांनी फक्त फेरीवाल्यांची पाठराखण केली. जे प्रभागात फेरीवाल्यांची पाठराखण करण्यासाठी त्यांनी एका इसमाकडून जे प्रभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पैसे स्वीकारल्याची समाज माध्यमांत चित्रफित प्रसारित झाली आहे. त्यामुळे भगवान पाटील यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी शहरातील अनेक संस्था, जाणते नागरिक, राष्ट्र कल्याण पक्षाचे महासचिव राहुल काटकर यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे.

फेरीवाला हटाव पथकात कार्यरत असताना प्रथक प्रमुख पाटील हे प्रभागातील वरिष्ठ, कर्मचाऱ्यांशी अतिशय अरेरावीने वागत असल्याच्या तक्रारी आता कर्मचारी, अधिकारी करत आहेत. डोंबिवली पूर्वेत फ प्रभागात असताना पाटील यांचे फेरीवाल्यांची पाठराखण करतानाचे अनेक कारनामे उघड झाले होते. आपणास ठाणे, डोंबिवलीतील अनेक उच्चपदस्थ राजकीय मंडळींचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आपणास कोणी काही करणार नाही, अशी भाषा अलीकडे ते पालिकेत कर्मचाऱ्यांबरोबर करत आहेत, अशा माहिती पालिका कर्मचारी देतात.

कल्याण पूर्वेत जे प्रभाग हद्दीतील लोकग्राम रस्त्यावर उसाचे काही चरखे होते. त्यांच्यावर पथक प्रमुख भगवान पाटील यांनी पहिले कारवाई केली. त्यानंतर हे चरखे पुन्हा सुरू झाल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. कल्याण पूर्व रेल्वे स्थानक परिसर अरूंद रस्ते, गल्ली बोळ, दाट वस्तीचा भाग आहे. या भागात रस्त्यांवर फेरीवाले बसले की वाहनांना, पादचाऱ्यांना अडथळा येतो. या भागात वाहन कोंडी होते. हे माहिती असुनही पथकप्रमुख पाटील यांचे फेरीवाल्यांशी संधान असल्याने रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर ते कारवाई करत नाहीत, अशा तक्रारी रहिवासी करतात.

भगवान पाटील यांची आतापर्यंतची फेरीवाला हटाव पथकातील कामगिरी ही फक्त फेरीवाल्याचे पाठराखण करणारी राहिली आहे. भगवान पाटील यांना तातडीने फेरीवाला हटाव पथकातून निलंबित करण्यात यावे. ते फेरीवाल्यांकडून स्वीकारत असलेले पैसे पालिकेतील किती जणांना वाटत होते याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महासिचव काटकर यांनी केली आहे.आपल्यावर पालिकेकडून कारवाई होऊ नये म्हणून सध्या भगवान पाटील हे विविध राजकीय मंडळींच्या भेटीगाठी घेत असल्याची जोरदार चर्चा पालिकेत आहे.

अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी माध्यमांना सांगितले, पथकप्रमुख भगवान पाटील यांनी जे प्रभागात केलेला प्रकार आक्षेपार्ह आहे. यासंदर्भात त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात येईल. त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पाटील यांना पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले नाहीतर आम्ही प्रसंगी पालिकेसमोर आंदोलन करू, असा इशारा महासचिव राहुल काटकर यांनी दिला आहे. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही.

Story img Loader