शहापूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळून गेलेल्या तरुणाला वासिंद पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले होते. परंतु त्याला रेल्वेगाडीतून आणत असताना तरुणाने प्रसाधनगृहाच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी वासिंद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी निलंबित केले आहे. याप्रकरणात हलगर्जी झाली का, याचा तपास करायचा असल्याने निलंबन करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
हेही वाचा – मुंबई नाशिक महामार्गावरील अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
हेही वाचा – ठाणे : चोरीच्या संशयावरून एकाची हत्या, चौघांना अटक
शहापूर तालुक्यातील सोळा वर्षीय मुलगी आणि भिवंडी तालुक्यातील अनिकेत जाधव हे दोघेही २५ जुलैला घरातून निघून गेले होते. या घटनेनंतर मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी वासिंद पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार वासिंद पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने शोध घेतला असता, अनिकेत हा दिल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोघांचा सुगावा लागल्याने वासिंद पोलिसांनी आणि मुलीच्या नातेवाईकांनी दिल्ली येथे धाव घेतली. दिल्ली पोलिसांच्या मदतीने अनिकेत आणि त्याच्या सोबत असलेल्या मुलीला २५ ऑगस्टला दिल्ली येथून ताब्यात घेतले. तेथून राजधानी एक्सप्रेस या रेल्वेगाडीने त्यांना आणत असताना रेल्वेगाडी मध्य प्रदेश येथे आली. त्यावेळी अनिकेत याने बोगीमधील प्रसाधनगृहाच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. याबाबत मध्यप्रदेशच्या (मुराई ) रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याबाबतचा तपास मध्यप्रदेशचे पोलीस करत आहेत. दरम्यान, दिली ते महाराष्ट्र प्रवासा दरम्यान अनिकेतचा अपघाती मृत्यू झाल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस अंमलदारांना निलंबित करण्यात आले असल्याचे पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे यांनी सांगितले.