ठाणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एकाने त्याच्या साथिदाराच्या मदतीने तिची हत्या केली. तिचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकून दिला. मृतदेह आळ्या पडून तो पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. असे असतानाही मुंब्रा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवून यातील दोन्ही आरोपींना अटक केली. नबाब शेख (२७), सलमान खान (२०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुन्नी असे मृत महिलेचे नाव आहे, अशी माहिती उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत २७ मे या दिवशी एक मोठी गोणी तरंगताना आढळून आली. ही गोणी बाहेर काढली असता, गोणी पूर्णपणे चिकटपट्टीने बंद असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गोणी उघडली. त्यावेळी एका चादरमध्ये गुंडाळलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. मृतदेहावर आळ्या पडल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. तसेच त्याला दुर्गंधीही सुटली होती. या घटनेप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त गणेश गावडे यांनी मुंब्रा पोलिसांचे तीन विशेष पथके तयार केली. यातील एका पथकाने ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील कोण महिला हरवली आहे का, याची पडताळणी केली. परंतु कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.

हेही वाचा >>>“ठाण्यात पोलीस संरक्षण दिलेले १०० जण कोण? सरकारी पैशाची उधळपट्टी का?” अजित पवारांचा शिंदे सरकारला सवाल

महिलेचा मृतदेह २७ मे या दिवशी आढळून आला होता. त्यामुळे हा मृतदेह तीन ते चार दिवससांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांना होता. त्याअनुषंगाने दुसऱ्या पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक उगलमुगले यांनी २० ते २७ मे या दिवसांचे सीसीटीव्ही तपासले. या सीसीटीव्हीमध्ये २४ मे या दिवशी रात्री १० वाजताच्या सुमारास एक तीन चाकी टेम्पो संशयास्पद आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी हा टेम्पो ज्या मार्गावरून आला. तेथील सीसीटीव्ही चित्रीकरणांची पाहणी केली. २० ते २२ सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी या टेम्पोचा नोंदणी क्रमांक मिळवला. हा टेम्पो मुंबईतील वर्सोवा भागात राहणाऱ्या नबाब शेख याच्या नावे असल्याचे समोर आले. पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले असता, घराला कुलूप होते. त्याच्या शेजाऱ्यांनी नबाब आणि त्याची पत्नी मुन्नी ही गायब असल्याची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत वृक्ष गणनेला प्रारंभ,जुनाट वृक्षांची वारसा वृक्ष म्हणून नोंद होणार

दरम्यान, नबाब हा त्याच्या मूळगावी पश्चिम बंगाल येथे विमानाने गेल्याची माहिती खबऱ्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक पश्चिम बंगाल येथे रवाना झाले. तर तिसऱ्या पथकाने मुंबईमधील सीसीटीव्ही तपासले असता, एका चित्रीकरणात नबाब याच्यासोबत सलमान खान हा आढळून आला होता. पोलिसांनी त्याला अंधेरी येथून ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने नबाबसोबत हा गुन्हा केल्याची कबूली दिली. नबाबने मुन्नीचा गळा आवळून ठार केले. तर सलमानने त्याला या प्रकरणात साथ दिली असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सलमानला अटक केली. पश्चिम बंगाल येथे गेलेले पोलिसांचे पथक हे आठ दिवस तेथेच थांबून नबाबचा शोध घेत होते. त्यानंतर ७ जूनला पोलिसांच्या पथकाने नबाबला ताब्यात घेऊन अटक केली.

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत पहिल्याच पावसात गटारे तुंबल्याने रस्तोरस्ती सांडपाणी

मुन्नी आणि नबाब यांचा २०१२ मध्ये निकाह झाला होता. परंतु तिच्या चारित्र्यावर नबाबला संशय होता. नबाब हा परिसरात झाडांच्या फांद्या छाटण्याची कामे करतो. त्याच्याकडे सलमान हा कामाला होता. त्याने सलमानसोबत मुन्नीच्या हत्येचा कट रचला. २४ मे या दिवशी दुपारी २ वाजता सलमान आणि नबाब दोघेही घरी आले. त्यावेळी नबाबने मुन्नीचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळला. तर सलमानने तिची पायाची हालचाल होऊ नये म्हणून पाय पकडून ठेवले. अवघ्या काही मिनीटांत मुन्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचे प्रेत चादरमध्ये गुंडाळून प्लास्टिकच्या गोणीमध्ये भरून त्यावर चिकटपट्टी चिटकवली. तसेच तो मृतदेह वर्सोवा येथून रेतीबंदर येथे टेम्पोमधून आणला आणि रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांनी मृतदेह खाडीत फेकून दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspicious character of wife murder body found but accused arrested by police on the basis of cctv amy