ठाणे : गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षानिमित्त स्वागत यात्रा काढण्याची परंपरा ठाण्यात गेली अनेक वर्षे सुरू आहे. पारंपरिक वेशभूषेतील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, शाळकरी मुला-मुलींच्या सहभागामुळे यात्रेतील उत्साह ओसंडून वाहत असतो. स्वागत यात्रेत विविध सांस्कृतिक, सामाजिक आशयाचे चित्ररथ तयार केले जातात. त्या विषयांवर त्यातून जनजागृती केली जाते. या वर्षीची स्वागत यात्रा ही प्रयागराज महाकुंभाच्या संकल्पनेवर आधारित असेल. म्हणजे, ठाण्यात सांस्कृतिक महाकुंभच भरवला जाईल.
ठाणे शहरात श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या हिंदू मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे २५ वे वर्षे आहे. त्यामुळे आयोजकांकडून यंदाच्या स्वागत यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या संस्थांच्या संख्येत वाढ झाली असून शहरातील ८० हून अधिक संस्था यंदा स्वागत यात्रेत सहभागी होतील.
ठाणे शहरातील स्वागत यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या शहरात विविध संस्थांच्या मार्फत सामाजिक संदेश देणारे चित्ररथ साकारले जातात. यंदा ‘संस्कृतीचा महाकुंभ-आपले ठाणे आपली स्वागत यात्रा’ या संकल्पनेअंतर्गत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा विविध विषयांवर आधारित असे ७० हून अधिक चित्ररथ साकारले जातील, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. त्यासह, महिलांची बाईक रॅली, सायकल रॅली, मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिके, लेझीम व ढोलताशा पथकही सहभागी होतील.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज, शनिवारी मासुंदा तलाव येथे दीपोत्सव आणि गंगा आरती होणार आहे. तर, गावदेवी मैदानात फोटो सर्कल सोसायटीच्या वतीने स्वागत यात्रेचे मागील काही वर्षांचे छायाचित्र प्रदर्शन, प्रसिद्ध व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर यांनी काढलेल्या अर्कचित्रांचे प्रदर्शन, शिवराज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र दर्शन प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
नौपाड्यात २५ फुटी गुढी
ठाण्यातील गुढीपाडवा स्वागत यात्रेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने नौपाडा व्यापारी संघटना यांच्या वतीने २५ फुटी गुढी भारली जाणार आहे. तसेच यात्रेत सहभागी नागरिकांना आईस्क्रीमचे वाटप करून यात्रेचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती ठाणे शहर व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांनी दिली.