ठाणे: गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाणे शहरात काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेचे यंदा २५ वे वर्ष आहे. यानिमित्त यंदाची यात्रा भव्य दिव्य करण्याचा श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचा प्रयत्न आहे. नुकताच पार पडलेला प्रयागराजचा महाकुंभ डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या स्वागत यात्रेत संस्कृतीचा महाकुंभ दिसायला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन न्यासाच्या वतीने सर्व सहभागी संस्थाना तसेच ठाणेकरांना केले जात आहे.
श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने शहरात स्वागत यात्रा काढली जाते. या स्वागत यात्रेत शहरातील विविध संस्था एकत्रित येत वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारतात. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध संदेश तसेच जनजागृती करण्यात येते. यंदा या स्वागत यात्रेचे २५ वे म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यंदाची यात्र भव्य स्वरुपात काढण्याचा न्यासाचा प्रयत्न आहे. त्यासाठी न्यासाने तीन महिन्या आधीपासून तयारीला सुरुवात केली आहे.
दर सोमवारी न्यासाकडून स्वागत यात्रा संदर्भात बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत शहरातील विविध संस्था येतात आणि आपल्या संकल्पना मांडतात. या सोमावरी झालेल्या बैठकीत श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या सचिव यांनी यंदाच्या स्वागत यात्रेत प्रयागराजच्या महाकुंभाप्रमाणे संस्कृतीचा महाकुंभ दिसला पाहिजे असे आवाहन संस्थांना केले आहे. त्यासाठी तुम्ही राहतात त्या गृहसंकुलातील रहिवाशांना तसेच तुमच्या संपर्कातील इतर नागरिकांना या यात्रेत कसे सहभागी करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यंदा विविध नविन संस्था तसेच गृसंकुले या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली.
यंदा वागळे इस्टेट मधून देखील निघणार उपयात्रा गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाणे शहरात काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर वागळे इस्टेट भागातून प्रथमच उपयात्रा निघणार असल्याची माहिती आयोजकांनी बैठकीत दिली. वागळे इस्टेट मधील सर्व सार्वजनिक मंडळांना सांगून गुढी उभारली जाणार आहे. त्या गुढीची स्वागत यात्रेत पूजा केली जाणार आहे. तसेच ढोल ताशा पथक, वेशभूषा स्पर्धा, चित्ररथ असे स्वरूप स्वागत यात्रेचे असेल अशी माहिती वागळे इस्टेट उपयात्रे चे आयोजक भावेश शिंदे यांनी दिली. ठाणे शहरात आतापर्यंत १२ उपयात्रा निघत होत्या आता वागळे इस्टेटची उपयात्रा धरुन एकूण १३ उपयात्रा शहरात निघणार असल्याची माहिती न्यासाच्या वतीने देण्यात आली.