ठाणे : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त रविवार, १९ मार्चला सायकल रॅलीच्या माध्यमातून विविध १० मंदिरांना भेटी दिल्या जाणार आहेत. श्री कौपिनेश्वर मंदिरापासून सकाळी ८ वाजता रॅली सुरू होणार असून ती याच मंदिरात समाप्त होणार आहे, अशी माहिती नुकत्याच झालेल्या बैठकीत दिली.
न्यासाने नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची घोषणा केली. रविवार, १९ मार्चला सकाळी ८ वाजरा सायकल रॅली असून त्याच दिवशी समर्थ भारत ज्येष्ठ भारत आणि त्याला जोडून अमृतमहोत्सव या विषयावर सकाळी रांगोळी स्पर्धा होणार आहे. संध्याकाळी स्पर्धेचे उद्घाटन आहे. सायंकाळी श्री कौपिनेश्वर च्या प्रांगणात शिवतांडव यावर आधारित नृत्यधारा कार्यक्रम असून यात गुरू आणि शिष्यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. सोमवार, २० मार्चला बासरी, तबला आणि सनई वादन यांचे एकल सादरीकरण होणार आहे.
हेही वाचा >>> बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरील वाढत्या लुटमारीने प्रवासी हैराण
गंधार भालेराव यांचे बासरी वादन आणि मुकुंदराज देव यांच्या शिष्यांचे तबला वादन तर शैलेश भागवत यांचे सनई वादन सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे. मंगळवार, २१ मार्चला गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ५.३० वाजता शृंगेरीला गेलेल्या लहान मुलांचे भगवतगीतेचे अध्याय होणार आहेत, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने ज्ञानकेंद्र सभागृहात नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात बैठक झाली. या स्वागत यात्रेत सहभागी होणारे विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, सचिव डॉ. अश्विनी बापट, निमंत्रक शंतनू खेडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.