नववर्षांचा संकल्प केवळ स्वविकासासाठी न सोडता आपला समाज, परिसर विकासासाठी नवीन काही करता येईल का, या दृष्टिकोनातून प्रत्येक जण विचार करूलागला आहे. त्यातूनच चैत्र पाडव्यानिमित्त प्रत्येक शहरात निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रा या केवळ आता उत्सवी रूपात न अडकता काही सामाजिक सेवा, प्रबोधनाचे संदेश देता येईल का, याचा विचार करूलागल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या काही भागात सलग दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत स्वागतयात्रांच्या संयोजक संस्था शहरवासीयांना दुष्काळात होरपळत असलेल्या आपल्या बंधू-भगिनींना सहकार्य करण्यासाठी आवाहन करीत आहेत.
३१ डिसेंबरची मध्यरात्र म्हणजे भारतवर्षांचे नवीन वर्ष समजून, पाश्चात्त्यांप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची एक टूम आहे. या जल्लोषात तरुणाई सर्वाधिक सामील होते. नववर्षांचे स्वागत म्हणजे मद्यपान, धिंगाणा, कर्णकर्कश आवाजात वाजविण्यात येत असलेली अचकट विचकट गाणी. थोडक्यात आपला आनंद साजरा करताना दुसऱ्याची शांतता हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असतो. कोणत्याही चुकीच्या गोष्टीपासून समाजाला परावृत्त करायचे असेल तर त्याला उत्तम पर्याय द्यावा लागतो. डोंबिवलीतील काही मंडळींनी श्रीगणेश मंदिर संस्थानच्या पुढाकाराने चैत्र शुद्ध एक अर्थात गुढी पाडव्यापासून सुरू होणारे शालिवाहन नववर्ष साजरा करण्याचा पायंडा पाडला. ज्याचे अवघ्या महाराष्ट्रात अनुकरण झाले. ३१ डिसेंबरच्या प्रवाहात वाहत चाललेल्या तरुणाईला भारतीय पारंपरिक, सामाजिक संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात आणणे, शहर परिसरातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना एका व्यासपीठावर आणणे, या एकत्रित समूहातून विधायक कार्य करण्याचा संकल्प सोडणे, हा नववर्ष स्वागतयात्रेचा मुख्य हेतू होता.
डोंबिवलीत पहिल्यांदा नववर्ष स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. अभूतपूर्व असा प्रतिसाद या नववर्ष स्वागतयात्रेला मिळाला. समाजाच्या विविध जाती, धर्म, पंथामधील मंडळी स्वागतयात्रेच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येऊ लागली. यात्रेनिमित्त आठवडाभर अगोदर आयोजित सामाजिक, सांस्कृतिक, सांगीतिक कार्यक्रमात शहरातील प्रत्येक स्तरातील नागरिक सहभागी होऊ लागले. या कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरातील विविध कलागुण असलेली, विविध प्रांतांमधील शहरात एकवटलेली मंडळी एकत्र येऊ लागली. विविध संस्था एकत्र येऊ लागल्याने त्यांच्या आचारविचारांची देवाणघेवाण सुरूझाली. महाविद्यालयांमधील विविध शाखांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी एकत्र येऊन, शहर परिसर विकासाचा विचार करूलागली. केवळ उत्सव नव्हे तर शहर, गाव, समाजासाठी काम करण्याची एक उत्तम संधी म्हणून नववर्ष स्वागतयात्रेकडे पाहिले जाऊ लागले. डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रेचा विचार बघता बघता राज्यभर पसरला. देशाच्या विविध भागात, परदेशात मराठी मंडळी एकत्र राहात असलेल्या ठिकाणी चैत्र पाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येऊ लागल्या.
अनेक वर्षांपासून डोंबिवलीसह कल्याण, उल्हासनगर, २७ गाव परिसरात नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येतात. शोभायात्रेच्या एक महिना अगोदर नववर्ष स्वागतयात्रेचे नियोजन करण्यासाठी संयोजक मंडळींच्या बैठका सुरू होतात. सर्व स्तरातील मंडळी, संस्थांना उपक्रमात सहभागी करून घेतले जाते. या उत्सवात युवक, युवती, ज्येष्ठ, वृद्ध, बालगोपाळ, स्त्रिया, विविध संस्थांचा सहभाग उत्स्फूर्त असतो. लेझीम, ढोल पथके, केरळ, कर्नाटक भागातील विशेष वाजंत्र्यांना आमंत्रित करून एक वेगळी पेशकश शहरात सादर केली जाते. चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक संदेश, मनोरंजन, स्थळ, काळाचे प्रदर्शनीय देखावे ट्रकमध्ये उभे करून त्याचे शहरभर सादरीकरण केले जाते. कल्याणमध्ये मुस्लीम समाजातर्फे नववर्ष स्वागतयात्रेचे स्वागत केले जाते. उल्हासनगरमध्ये सिंधी समाजाची मंडळी सहभागी होतात. टिटवाळ्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थ सहभागी होतात. असा सामाजिक समतेचा संदेश स्वागतयात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. असहिष्णूतेचे वारे विविध माध्यमांतून देशात वाहात आहेत. पण तो वारा कधी अनेक जाती, धर्म, पंथांची वस्ती असलेल्या कल्याण-डोंबिवली शहरांना लागत नाही. याचे कारण विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून येथील समाज आपला विचार, संस्कृती, प्रथांची सतत देवाणघेवाण करतो. त्यात सर्व समाजाला सहभागी करून घेत असतो.
कल्याणमधील संस्कृती मंचतर्फे आयोजित नववर्ष स्वागतयात्रेत यावेळी पाणी बचत, पाणी वाचवा, पाणी जिरवाचा संदेश स्वागत यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. यापूर्वी खेडोपाडी असणारी पाण्याची टंचाई शहरांच्या उंबरठय़ांवरून थेट इमारतींमधील सदनिकांमध्ये घुसली आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने यावेळी शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे कोरडी ठाक पडली आहेत. त्यामुळे प्रत्येकाने पाणी बचत करायला हवी, असा एक महत्त्वपूर्ण संदेश स्वागतयात्रेच्या माध्यमातून देण्यात आला. शहर परिसरातील रहिवाशांना माफक दरात डायलिसीसची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून गणेश मंदिर संस्थान प्रयत्न करीत आहे. याशिवाय मंदिराचे अन्य सामाजिक सेवेचे उपक्रम सतत सुरू असतात. अशा संस्थांतर्फे शहर परिसरात सुरू असलेल्या नववर्ष स्वागतयात्रा आता केवळ उत्सवी रूपात न राहता, सामाजिक सेवेच्या वळणावरून प्रबोधनाच्या कार्यशाळा होऊ पाहात आहेत. हे निश्चित स्वागतार्ह आहे.
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
चैत्रपाडव्याच्या दिवशी चार ते पाच तास शहरभर यात्रा फिरवली. म्हणजे उत्सव साजरा केला असे होता कामा नये, म्हणून डोंबिवलीतील श्रीगणेश मंदिर संस्थानने दोन ते तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्ती, संस्था, दानशूर मंडळींना दुष्काळग्रस्तांना वस्तूरूपाने मदत करण्यासाठी आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ट्रकवारी साहित्य दोन वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्त भागात पाठविण्यात येऊन त्याचे वाटप करण्यात आले. स्वागतयात्रेच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून गणेश मंदिर संस्थानने सातारा परिसरातील दुष्काळी गावे निवडून तेथे लहान बंधारे, कालवे काढून जलसाठे उपलब्ध करून दिले आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा म्हणून किराणा दुकाने, शेळी पालन हे व्यवसाय सुरू करून दिले आहेत. गावात जलसाठे उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थ उपलब्ध पाण्यावर भाजीपाला लागवड करतात. त्यामुळे एक रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. गाई, गुरांसाठी पाणी असल्याने दूध विक्री व्यवसाय काहीजण करीत आहेत. नववर्षांचा एक विधायक संकल्प व्यवसाय, रोजगार आणि कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देऊ शकतो, हेही नववर्ष स्वागतयात्रेने सिद्ध करून दाखविले आहे. शहर स्वच्छतेचा भाग म्हणून गणेश मंदिर संस्थानने शहरातील सर्व मंदिरांमधील निर्माल्य एकत्रित करून त्या माध्यमातून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. हे खत परिसरातील झाडे, उद्याने बगीचांना देऊन, झाडे टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. डोंबिवलीत शहर स्वच्छतेचा भाग म्हणून एक ‘व्हिजन डोंबिवली’ अभियान सुरूझाले आहे. नववर्ष स्वागतयात्रेमधील विविध संस्था, व्यक्ती, युवक, युवतींनी या उपक्रमात अधिक संख्येने सहभागी होऊन शहर स्वच्छता केवळ पालिका नव्हे तर नियोजनबद्धतेने शहरवासीयही करू शकतात, हे दाखवून दिले आहे.