जागेच्या प्रश्नावर ई-बुकची मात्रा; वाचकांसाठी टॅबची सुविधा
ठाणे : ठाण्यातील सर्वात जुने वाचनालय म्हणून ओळखले जाणारे ठाणे नगर वाचन मंदिर आता आधुनिक रूपात वाचकांच्या भेटीला येणार आहे. जागेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी ई-बुक्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाचकांसाठी टॅब खरेदी करण्यात येणार असून त्यावर विविध भाषांतील गाजलेले साहित्य उपलब्ध असेल, अशी माहिती व्यवस्थापनाने दिली.
ठाण्यातील १६७ वर्षे जुने आणि सर्वात पहिले वाचनालय असलेल्या ठाणे नगर वाचन मंदिरात ५० हजारांहून अधिक पुस्तके आहेत. पुढील महिन्यापासून वाचनालयात ई-बुक्सची सुविधा देण्यात येणार आहे. टॅबवर किंडलचे सदस्यत्व घेण्यात येणार असून त्याद्वारे जागतिक स्तरावरील साहित्य वाचता येणार आहे. पहिल्या टप्प्यात ४ टॅब खरेदी केले जाणार असून ते मुक्तद्वार वाचनालयात ठेवण्यात येतील. ई-बुक्स उपक्रमासाठी ४० हजार रुपये खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे या सुविधेसाठी वाचकांकडून कोणतेही अतिरिक्त दर आकारले जाणार नाहीत, असे ठाणे वाचन मंदिराच्या व्यवस्थापनाने सांगितले.
सद्यस्थितीत ठाणे नगर वाचन मंदिरात पुस्तके ठेवण्यासाठी ७२ कपाटे आहेत. परंतु ती अपुरी पडू लागल्यामुळे नवी पुस्तके ठेवण्यात अडथळे येत आहेत, त्यामुळे यापुढे डिजिटल माध्यमांचा वापर करून अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासोबतच लोकप्रिय आणि जास्त मागणी असणारी पुस्तके विकत घेण्यात येतील, असे वाचनालय व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.
वाचकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न
वाचकांची संख्या वाढावी, यासाठी ठाणे नगर वाचन मंदिरातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. वाचनालयाला रंगरंगोटी करण्यात आली असून हवा खेळती राहावी यासाठी रचनेत बदल करण्यात आले आहेत. वाचनालय १२ तास खुले ठेवण्यात येत असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे वाचन मंदिर प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
वाचकांना उत्तम साहित्य वाचता यावे यासाठी ठाणे नगर वाचन मंदिरातर्फे विविध उपक्रम राबण्यात येतात. ई-बुक्स उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असून वाचकांचा प्रतिसाद पाहून टॅबची संख्या वाढवण्यात येईल.
-केदार जोशी,अध्यक्ष, ठाणे वाचन मंदिर