ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरूवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ठाणे येथील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीत विश्वातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरवल्याची खंत व्यक्त होते आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. तबला वादन या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ तबलावादक पंडित अहमदजान थिरकवा यांचे अखेरचे शिष्य अशी भाई गायतोंडे यांची ख्याती होती. केमिकल इंजिनिअर असूनही त्यांचा कल तबला वादनाकडे अधिक होता. पंडित जगन्नाथबुवा पुरोहित अर्थात गुणीदास यांच्याकडेही त्यांनी तबला वादनाचे धडे गिरवले होते. गुरूवारी रात्री ११.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.