उल्हासनगरः गेल्या वर्षात तडीपार करण्यात आलेला एक चोरटा उल्हासनगरात दुचाकींची चोरी करत असल्याची बाब समोर आली होती. अखेर पोलिसांनी सापळा रचत या तडीपार चोराला अटक केली आहे. हितेश कटेजा असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ८ चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यावेळी पोलिसांनी ४ लाख २५ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प चार भागातील साई प्रेरणा इमारतीमधून २५ मार्च रोजी मध्यरात्री एक सुझुकी बर्गमन स्ट्रीट ही दुचाकी चोरीला गेली होती. त्याची तक्रार मालक सुनील कारीरा (वय ५३) यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही चित्रणाचा आधार घेत संशयीत आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ३० मार्च रोजी ऍक्टिवा स्कूटीसह हितेश कटेजाला सापळा रचून अटक केली.
अटक केल्यानंतर चौकशीत हितेशने ही स्कूटी उल्हासनगर कॅम्प दोन मधून चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण त्याने गुन्हा मान्य केला. त्यानंतर शहरातील विविध भागांतून चोरी केलेल्या तब्बल आठ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या दुचाकींची एकूण किंमत ४ लाख २५ हजार रुपये इतकी आहे. तसेच तपासात त्याने विठ्ठलवाडी, मध्यवर्ती आणि हिललाईन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकली चोरल्या आणि त्या विक्रीसाठी ठेवल्याचे माहिती पोलीसांनी दिली आहे. हा आरोपी गेल्या वर्षात तडीपार करण्यात आला होता.
असा ताब्यात आला आरोपी
३० मार्च रोजी विठ्ठलवाडी मध्यरात्री ३ वाजता पोलीस आरोपी हितेशचा पाठलाग करत होते. मात्र हितेश पोलिसांना चकवा देत एका इमारतीत शिरला. आपली ओळख पटू नये म्हणून आरोपीने प्रत्येक गुन्ह्यात वापरत असलेला पोषाख काढून टाकला. त्यानंतर आरोपी चड्डी – बनियानवर इमारतीच्या बाहेर आला. त्याचवेळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता काही झालेच नाही अशा अविर्भावात तो पोलिसांना आपण मित्राकडे आलो होतो, असे सांगितले. मात्र पोलिसांनी सिसिटीव्ही चित्रण आणि पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने तात्काळ आपला गुन्हा कबूल केला.
चोरी करण्यासाठी विशेष पोषाख
हा आरोपी चोरी करण्यासाठी विशेष पोषाख परिधान करत असल्याची माहिती समोर आली आहे. कुणालाही संशय येऊ नये म्हणून हा आरोपी नामांकीत कंपनीचे जॅकेट परिधान करून तोंडाला कपडा बांधून चोरी करत होता. दुचाकी चोरीचे पाच सिसिटीव्ही चित्रण मिळवले असून या सर्व चोऱ्यांमध्ये त्याने असाच पोषाख वापरल्याचे दिसून आले आहे.
आंबिवलीच्या इराणी वस्तीत विक्री
दुचाकी चोर हितेश याला मौजमजा करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे अनेक दुचाकी चोरीनंतर आंबिवली मोहने येथील इराणी वस्तीत कमी किमतीत विकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी इराणी वस्तीमधून या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.