मागच्या लेखामध्ये आपण कॉमन जय या फुलपाखराची माहिती घेतली. आज आपण त्याच्याच भाऊबंदाविषयी टेल्ड जयविषयी माहिती घेणार आहोत.
टेल्ड जय हेसुद्धा पँपिलिओनीडी कुळातील म्हणजेच एक स्वँलोटेल फुलपाखरू आहे. स्वँलोटेल फुलपाखरांची ओळख म्हणजे त्यांच्या पंखांना असणारे शेपटीसारखे टोक. या फुलपाखरांना अशी शेपटी असते म्हणून हे टेल्ड जय.
मोठय़ा आकाराच्या या फुलपाखराचे पंख वरच्या बाजूस काळ्या रंगाचे असतात आणि त्यावर हिरव्या रंगाचे उभे लंबगोलाकार ठिपके असतात. हा हिरवा रंग काहीसा पोपटी रंगाकडे झुकणारा असतो. पंख पसरून हे फुलपाखरू बसले की त्याचा आकार काहीसा त्रिकोणी दिसतो. शिवाय अंगावर असणारे हिरवे ठिपके यामुळे या फुलपाखराला ग्रीन ट्रँगल ग्रीन स्पौटेट ट्रँगल नावानेही संबोधतात.
या फुलपाखरांच्या पंखांच्या खालच्या बाजूचा रंग गडद तपकिरी असतो आणि त्यावरही हिरवे ठिपके असतात. मात्र मध्यावरचे ठिपके सोडले तर इतर ठिपके हे आकाराने लहान असतात.
ही फुलपाखरे कायम उडत राहतात. त्यांचे उडणेही दमदार असते. उडताना आणि फुलावर बसल्यावरसुद्धा यांच्या पंखांची उघडझाप होत राहते. बागांमधील लँटाना, मसांडा अशा फुलांवरती त्यांच्या उडय़ा पडतात. मध पिण्याइतकेच यांना चिखलावर बसून मडपेडलिंग करणेही आवडते. ही फुलपाखरे नेहमी झाडांच्या शेंडय़ाच्याही वर उडत असतात, मात्र फुलांवरती बसण्यासाठी आणि मडपेडलिंगसाठी ते खाली उतरतात.
भारत आणि श्रीलंका हे या फुलपाखरांचे मूलस्थान मानले जाते, पण संपूर्ण दक्षिण आशियात आणि ऑस्ट्रेलियातही ही फुलपाखरे सापडतात.
भरपूर पावसाच्या प्रदेशात अगदी समुद्रसपाटी, उंच डोंगररांगा, माळ, गर्द झाडी अशा सगळीकडे ही फुलपाखरे सापडतात.
यांची एक प्रजाती अंदमान निकोबारमध्ये सापडते. या अंदमानी फुलपाखरांच्या अंगावरील ठिपके हे आकाराने लहान असतात.
या फुलपाखरांच्या अंडी ते प्रौढावस्थेचा कालावधी हा अगदी कमी म्हणजे जेमतेम महिनाभराचा असतो. त्यामुळे एका वर्षांत यांच्या ७/८ पिढय़ा जन्मतात. या फुलपाखरांच्या अळ्या अनौनेसिया, मँगोफोलिया इत्यादी कुळांतील झाडांची पाने खाऊन वाढतात. यामध्ये अशोक, चाफा अशी झाडे येतात, जी शहरी बागांमध्ये मुद्दाम लावली जातात. त्यामुळे शहरांमध्येही टेल्ड जय हमखास दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tailed jay butterfly