लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर तातडीने कारवाई सुरू करा. या कारवाईत कोणीही पोलीस अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला तर, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त डॉ. आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला.

पुणे येथील एका धनाढ्याच्या मुलाने दोन संगणक अभियंत्यांना मद्यसेवन करून वाहन चालविताना उडविले. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डुंबरे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कल्याण, भिवंडी, उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत परिमंडळ हद्दीत बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्सबार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई सुरू करावी. कोणीही अधिकारी या कारवाईत कुचराई करत असेल, याची माहिती मिळाल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डुंबरे यांनी दिला.

आणखी वाचा-डोंबिवलीतील उद्योग स्थलांतराच्या जोरदार हालचाली, घाईघाईने स्थलांतरित संमतीपत्र भरून देण्यासाठी एमआयडीसीचा दबाव

रात्री उशिरपर्यंत नृत्यगाणी

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी परिसर, कल्याण शिळफाटा, नेवाळी, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात अधिक संख्येने डान्सबार आहेत. काही ठिकाणी पब्ज, बेकायदा हॉटेल्स, ढाबे आहेत. ढाब्यांवर चोरून मद्य विकले जाते. या ढाब्यांना शासनाची परवानगी नाही. डान्सबार बंद असताना ते रात्री उशिरापर्यंत चालविले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याविषयी ठाणे पोलीस आयुक्तालयापर्यंत अनेक तक्रारी गेल्या आहेत असे समजते.

पोलीस मुख्यालय, परिमंडळातील काही पोलीस अधिकारी वरिष्ठांचे ‘कलेक्टर’ म्हणून परिसरात काम करतात. ते अधिकारी या बेकायदा उद्योगांची पाठराखण करत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. असे जुने ‘कलेक्टर’ शोधून आयुक्त डुंबरे यांनी या अधिकाऱ्यांना पालिका मुख्यालय किंवा नियंत्रण कक्षात पदस्थापना देण्याची मागणी काही पोलीस अधिकारीच करत आहेत. अशा ‘कलेक्टर’ अधिकाऱ्यांची एक यादीच काही पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. हे अधिकारी वर्षानुवर्ष पोलीस आयुक्तालय क्षेत्रात असून त्यांची काही वरिष्ठांशी संबंध असल्याने या विषयावर उघडपणे बोलण्यास कोणीही अधिकारी तयार नाही.

आणखी वाचा-डोंबिवलीतील उद्योजक म्हणजे शासनाला कल्हईवाले वाटले का? डोंबिवलीतील उद्योजकांचा संतप्त सवाल

आता या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बार अशा बेकायदा व्यवहारांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला तर या अधिकाऱ्यांची यादी आयुक्त डुंबरे यांना देण्याच्या विचारात काही पोलीस अधिकारी आहेत. कल्याण परिमंडळातील एका वरिष्ठाचा एक कलेक्टर अन्य भागात बदलीने गेला. पण वरिष्ठाने अथक प्रयत्न करून त्या ‘कलेक्टर’ची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करून घेऊन आपले कार्य अबाधित चालू राहिल याची काळजी घेतल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take action against illegal hotels pubs and dance bars thane police commissioner ashutosh dumbre orders mrj
Show comments