अंबरनाथः अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. त्याविरूद्ध अंबरनाथ शहरात कॉंग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मोर्चा काढला आहे. सोबतच ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’ अशी घोषणाबाजी करत पाण्यासाठी काँग्रेसने रक्तदान सुद्धा केले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची भेट घेत काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी धारेवर धरत खडे बोलत सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. बारवी धरण आणि चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा केला जातो. पुरेसे पाणी असतानाही शहरात वितरणातील त्रुटींमुळे शहरातल्या विविध भागात कायम पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती असते. गेल्या अनेक वर्षांपासून काही भागात ही पाण्याची समस्या भेडसावते आहे. याबाबत अनेक वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तक्रारी करूनही समस्या सुटलेली नाही. गेल्या वर्षात खुद्द स्थानिक आमदारांना याबाबत आंदोलन करण्याची वेळ आली होती. याच पाणी टंचाईला कंटाळून कॉंग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला होता. शुक्रवारी कॉंग्रेसच्या वतीने ‘हम तुम्हे खून देंगे, तुम हमे पानी दो!’ अशी घोषणाबाजी करतथेट रक्तदान करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>> ठाण्यातील सहा केंद्रांवर नाकाद्वारे लसीकरण, पालिकेला मिळाला अडीचशे लशींचा साठा

उपस्थित नागरिकांनीही यावेळी रक्तदान करत पाण्याची मागणी केली. यानंतर काँग्रेसने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. अंबरनाथ पश्चिमेच्या इंदिरा भवन ते पूर्वेतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो महिला आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी मिलिंद बसनगार यांची भेट घेत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांना पाण्याबाबत जाब विचारला. यापुढे दर एक दिवसाआड दोन तास पाणी देण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र एक दिवसाआड नको तर दररोज किमान १ तास पाणी देण्याची मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली. ही मागणी मान्य करत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आल्याची माहिती काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिली.

हेही वाचा >>> ठाण्यात वज्रमुठ सभेच्या बॅनरवर पालिकेची कारवाई; राष्ट्रवादीची पालिका प्रशासनावर टीका

अधिकाऱ्यांना बंद एसीचा त्रास

आंदोलनातून आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात गर्दी केली होती. त्याच वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दालनातील वातानुकूलित यंत्रणा ठप्प आहे त्यामुळे गर्दी करू नका असा संदेश दिल्याने आंदोलक संतापले. पाण्यासाठी नागरिक उन्हात असताना तुम्हाला गार वाऱ्याची चिंता आहे का, असा सवाल करताच अधिकारी नरमले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take blood but give water congress agitation for water in ambernath ysh
Show comments