ठाणे : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे आणि मांडलेल्या समस्यांवर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.
ठाणे शहरातील लोकप्रतिनिधींच्या समस्यांविषयी रविंद्र चव्हाण यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीस आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे उपस्थित होते.
हेही वाचा >>> भिवंडीत रासायनिक गोदामांना आग
ठाणे शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण, फेरीवाला धोरण आणि पाणी समस्या याबाबत बैठकीत चर्चा झाली. या समस्यांविषयी प्रशासनाने गतीने कार्यवाही करावी असे निर्देश चव्हाण यांनी दिले. तसेच आवश्यक व तातडीच्या कामांसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तर लोकप्रतिनिधींच्या कामांना गती देण्यासाठी गांभीर्याने कामे करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
हेही वाचा >>> कल्याण : पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून स्थापत्य अभियंता महिलेची आत्महत्या
ठाण्यातील खोपट येथील भाजप कार्यालयात मंत्री चव्हाण यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक स्थितीबरोबरच ठाण्यातील राजकीय परिस्थितीचाही आढावा घेतला. भाजपाच्या ठाणे शहरातील ३३० शक्ती केंद्रप्रमुखांचीही बैठक घेऊन त्यांनी पक्ष मजबूत करण्याबाबत त्यांना विविध सूचना केल्या.