लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाचे पाणी साठवणे आणि जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. यासाठी जलयुक्त शिवार २.०, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. जलयुक्त शिवार टप्पा दोनची कामेही तातडीने सुरू करावीत. या अभियानाची लोकचळवळ व्हावी, यासाठी जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या नाम फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, वसुंधरा संस्था यांसारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी. अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिल्या.

जलयुक्त शिवार २.०, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

आणखी वाचा- मुरबाड रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण आंबिवली- मोहिली येथे ग्रामस्थांनी बंद पाडले

भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि खासगी हवामानशास्त्र संस्थानी वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस उशिराने राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सुचना केल्या. पावसाळा सुरू होण्यास कमी कालावधी उरला असून धरणे, नदी, नाले पाणी साठविण्याच्या ठिकाणी असलेला गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे तातडीने सुरू करावीत. तर पाणी साठवणुकीची क्षमता वाढ होणाऱ्या जागांची निवड स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करावी. जलयुक्त शिवार टप्पा दोनची कामेही तातडीने सुरू करावीत. हे अभियान लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रशासनाबरोबरच जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या नाम फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, वसुंधरा संस्था आदींसारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी. अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

पावसाची कमी सरासरी व निसर्गाचा लहरीपणा पाहता जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण या योजनांच्या कामांना प्राधान्य द्यावे. काही जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवारच्या टप्पा दोनमध्ये निवड झालेल्या गावांपेक्षा अधिकची गावे निवडण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. गावांनी आराखडा तयार करून कामे सुरू करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी व त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा. या कामांची पाहणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपण स्वतः करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सर्व पालकमंत्री यांनी आपल्या जिल्ह्यातील कामांवर लक्ष ठेवावे. सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण अधिकारी यांनी कामांचे नियोजन करून केवळ कागदोपत्री कामे न कामे न करता प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध जलस्रोतांचे बळकटीकरण करून यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान टप्पा एक मध्ये केलेल्या कामांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करावी. नवीन कामे लोकसहभागातून करून हे अभियान व्यापक स्वरूपात यशस्वी करावे. अशा सूचना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या बैठकीत केल्या.

आणखी वाचा- ठाण्यातील शौचालय कामांचे होणार त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण

जलसंधारणाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य ठरले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालामध्येही जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक नोंदविला आहे. राज्यात जलयुक्त शिवार टप्पा २ राबवित आहोत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. जलयुक्त शिवार योजनेसाठी ५४५ कोटी तर प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेसाठी ४२५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या गावांतील कामांची देखभाल, दुरुस्तीची कामे ही या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तातडीने हाती घ्यावीत. दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व अटल भूजल योजनेतील गावांना प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take the help of ngos while implementing jalyukta shivar abhiyan says chief minister eknath shinde mrj