ठाणे : घोडबंदर येथील आनंदनगर भागातील एका इमारतीमधील पाण्याची टाकी सफाई करताना अनमोल भोये (१५) याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या मृत्यूप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

घोडबंदर येथील टिकूजीनीवाडी भागातील कोकणीपाडा भागात राहत होता. तो टाकी साफ करण्याचे कंत्राट घेणाऱ्या एका कंपनीत काम करत होता. शनिवारी, २२ मार्चला कासारवडवली येथील एका १० मजली इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करण्याचा ठेका अनमोल काम करत असलेल्या कंपनीने घेतला होता. शनिवारी सांयकाळी टाकी साफ करत असताना तो बेशुद्ध पडला. अनमोल याला उपचारासाठी सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डाॅक्टरांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल होती. अनमोल याच्या वडिलांनी टाकीची पाहणी केली असता, तिथे त्यांना एक यंत्र आढळले होते. अनमोलच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याचा मृत्यू टाकीमध्ये विजेचा धक्का लागून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अनमोल याच्या वडिलांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.