१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारा वैजयंता रणगाडा देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षारक्षकांविना गर्दुल्ले, भिकारी आणि घाणीच्या वेढय़ात सापडला आहे. शहीद मेजर मनीष पितांबरे यांच्या स्मरणार्थ मुंब्रा स्थानकाबाहेर ठेवण्यात आलेल्या या रणगाडय़ाच्या परिसरात सध्या दारूच्या बाटल्या, कचरा, थुंकून केलेली घाण दिसते. त्यामुळे दररोज या स्मारकाची विटबंना होत आहे.
२००६ ला श्रीनगर येथील बीजबेहरा भागात हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या फैजल याला मनीष पितांबरे यांनी कंठस्नान घातले होते. त्यामुळे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा वैजयंता हा रणगाडा शहीद मेजर मनीष पितांबरे यांच्या स्मरणार्थ मुंब्रा स्थानकाबाहेर ठेवण्यात आला आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ‘संघर्ष’ या संस्थेला हा रणगाडा मिळाला होता. १९ मे २०१३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, रणगाडा मुंब्रा परिसरात यावा यासाठी अनेकदा मागणी करणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांना या रणगाडय़ाचा आणि शहीद स्मारकाचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.
रणगाडय़ाच्या खाली प्लास्टिकच्या पिशव्या, मातीचा थर निर्माण झाला आहे. स्मारकाच्या कुंपणावर गर्दुल्ल्यांनी थुंकून घाण केलेली आहे. अनेकजण छायाचित्र काढण्यासाठी या रणगाडय़ावर चढत असतात. दररोज या रणगाडय़ाची अशा प्रकारे विटंबना होत आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष देत नाही.