अंबरनाथ: नैसर्गिक नदी, नाल्यांमध्ये थेट सोडले जाणारे प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी आणि प्रदूषण रोखण्यात कायमच अपयशी ठरलेल्या प्रशासनाने अनेकदा सोपे मार्ग निवडले आहेत. यापूर्वी असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन १२ तास टँकर बंदीचा मार्ग अवलंबला होता. आता पुन्हा पोलिसांच्या विशेष शाखेने डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर येथील औद्योगिक क्षेत्रातून ४ जानेवारी २०२५ ते ४ मार्च २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घातली आहे. त्यामुळे पुन्हा उद्योजकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांमधील उत्पादनांसाठी लागणाऱ्या रसायनांची मोठ्या प्रमाणात शहरांतून वाहतूक होते. मात्र अनेकदा काही कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी पैसे वाचवण्यासाठी थेट शहरांतून जाणाऱ्या नदी आणि नाल्यात सोडण्यात येते. यामुळे नदीचे आणि खाडी पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. त्याचा आसपासच्या रहिवाशांना त्रास झाल्याचे यापूर्वीही समोर आले होते. याबाबत सातत्याने तक्रारी करूनही काही ठोस उपाययोजना करण्यात आलेले नाहीत. अंबरनाथ येथील वालधुनी नदी, उल्हास नदी, डोंबिवली – कल्याण येथील खाडीपात्रात अनेकदा या टँकरमधून रासायनिक सांडपाणी सोडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या टँकरची तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र ती न करता अशा वाहतुकीला बंदी घातल्याचे यापूर्वी दिसून आले होते. दिवसातील १२ तास औद्योगिक क्षेत्र आणि आसपासच्या शहरात बंदी घातली जाते. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हाच उपक्रम केला जातो आहे. मात्र या प्रकारावर यापूर्वीच उद्योजक आणि त्यांच्या संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा >>>डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांसाठी १५० मीटरची सीमारेषा
प्रतिक्रिया: शहरात आधीच दिवसा टँकर बंदी केली जाते. रात्री औद्योगिक क्षेत्रात बंदी केली जाते. मग उद्योग करायचे कसे आणि टँकर चालवायचे कधी याचे उत्तर द्यावे. उमेश तायडे, एडिशनल अंबरनाथ मन्युफॅक्चरर असोसिएशन.
उद्योजकांना अपेक्षित काय
औद्योगिक वसाहती मधील काही कंपन्या खर्चीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारता हे सांडपाणी हे टँकरमध्ये भरतात आणि उघड्या नाल्यांमध्ये सोडतात. त्यामुळे प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होतात. अशा काही प्रवृत्तींना रोखण्यासाठी या टँकरची तपासणी व्हावी अशी उद्योजकांची मागणी आहे. टँकर बंदीमुळे अनेकदा कच्च्या मालाचे टँकरही या काळात बंद ठेवावे लागतात. ते रस्त्याच्या कडेला उभे करावे लागतात. त्याचा उद्योजकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे आधीच हे टँकर रखडत उशिराने कंपन्यांमध्ये पोहोचतात. त्यामुळे प्रवास खर्च वाढला आहे.
हेही वाचा >>>ठाणे ते कर्जत-कसारा शटल सेवा वाढविण्याची मागणी
त्या चौकी बिनकामाच्या
एमआयडीसी प्रशासनाने टँकर तपासणीसाठी शहरांच्या प्रवेशद्वारावर चौकी उभारल्या होत्या. मात्र त्या सुरू होऊ शकल्या नाहीत. त्या अनेक महिने धूळ खात पडून होत्या. या चौकी सुरू करण्याऐवजी पुन्हा टँकर बंदीचा आदेश काढल्याने उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.