लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: रस्ता दुभाजकामधील झाडांना टँकर मधील पाणी टाकत असताना गुरुवारी सकाळी पाण्याचा एक टँकर कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली येथील पालिकेच्या ड कार्यालयासमोरील उतारावर आला. उतारावर असताना टँकरचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात येताच, त्याने तत्परतेने अपघात टाळण्यासाठी टँकर रस्ता दुभाजकाला धडकवला. त्यामुळे जीवित हानीचा मोठा अपघात टळला.
कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे शहर सुशोभिकरणाचा भाग म्हणून रस्ता दुभाजकांना रंग आणि त्यामध्ये शोभेची, सावली देणारी झाडे लावली आहेत. या झाडांना ठेकेदाराकडून नियमित टँकरव्दारे पाणी टाकले जाते. गुरुवारी सकाळी टँकर चालक दुभाजकांमधील झाडांना पाणी टाकत पालिकेच्या ड प्रभाग कार्यालया समोरील रस्त्यावरील उतारावर आला. ब्रेक लावून तो उतार उतरत असतानाच चालकाच्या टँकरचे ब्रेक लागत नसल्याचे निदर्शनास आले.
आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची घामाघामू थांबली, फलाट क्रमांक पाचवर पाच पंख्यांची तजविज
काटेमानिवली, ड प्रभाग कार्यालया समोरील रस्ता हा बाजारपेठेचा रस्ता आहे. या रस्त्यावर सतत वाहने, पादचारी, फेरीवाल्यांची वर्दळ असते. टँकरचे ब्रेक निकामी झाल्याचे समजात चालकाने प्रसंगावधान राखून अतिशय चलाखीने टँकर उतारावरुन पुढे जाऊन कोणत्या वाहन, पादचारी, दुकानाला धडकून अपघात होण्यापेक्षा स्टेअरिंग दुभाजकाच्या दिशेने वळून पाण्याने भरलेला टँकर रस्ता दुभाजकाला धडकविला. यावेळी मोठा आवाज झाला. परिसरातील व्यापारी, पादचारी हा प्रकार पाहून काही क्षण घाबरले. चालकाने घडल्या प्रकाराची माहिती दिल्यावर उपस्थितांनी चालकाचे कौतुक केले. चालकाच्या हजरजबाबीपणामुळे या रस्त्यावर होणारा भीषण अपघात टळला.