अंबरनाथच्या चिखलोली धरणातील पाण्यावर टँकरमाफियांचा डल्ला
अंबरनाथ : उल्हास नदीतील बेकायदा पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्यात पाटबंधारे विभागाला अपयश आले असतानाच अंबरनाथच्या चिखलोली धरणातूनही टँकर माफिया पाणी चोरत असल्याचे समोर आले आहे. पाण्याची पातळी खालावल्याचे कारण देत अंबरनाथ शहराला या धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. असे असताना शिल्लक पाण्यावर टँकरमाफिया मात्र डल्ला मारताना दिसत आहेत.
अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाने सध्या तळ गाठला आहे. धरणात शहराला अवघा आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहराला या धरणातून दुषित पाणी पुरवठा होऊ नये यासाठी येथून पाणी उचल थांबवण्यात आली आहे. त्याऐवजी महाराष्ट्र औद्य्ोगिक विकास महामंडळाकडून पाणी घेतले जाते आहे. धरणातीलला पाणी साठा कमी असल्याने शहराला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला जात असला तरी यामुळे टॅकरमाफियांची मात्र चंगळ झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र वाळवंट झाल्यासारखे दिसत आहे.असे असताना या धरणाच्या परिसरातून दिवसाला ५० ते ६० टँकर अनधिकृतपणे भरले जात असल्याची माहिती समोर येते आहे. या पाण्याची विक्रि शहरातील बांधकाम व्यावसायिकांना केली जात असल्याचे बोलले जाते. त्यासाठी दोन ते पाच हजारांपर्यंतची रक्कम आकारण्यात येते. धक्कादायक म्हणजे पिण्यायोग्य पाणी असा मजकूर लिहलेले पाण्याचे टँकरही याच धरणाच्या पाण्यातून भरले जात असल्याने नागरिकांना कोणत्याही प्रकारे प्रक्रिया न केलेले आणि दुषित पाणी पुरवले जात असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. शहरात पाण्याची समस्या डोके वर काढत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याचे पर्यायी नियोजन करताना दिसते आहे. मात्र त्याचवेळी धरणाच्या पाण्यावर असा टँकर माफिया डल्ला मारत असताना त्याची दखल पाटबंधारे विभागाकडून का घेतली जात नाही, असा सवाल उपस्थित होतो आहे. याबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क केला असता मनुष्यबळ कमी असल्याची बाब त्यांनी सांगितली. मात्र उघडपणे बोलण्यास नकार दिला.
टँकर माफियांचे गणित
शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित असलेल्या कंपन्यांच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धरणातून पाणी उचलून त्याची विक्रिी दोन ते पाच हजारांपर्यंत शहरात विविध कामांसाठी केली जाते. अवघ्या काही रूपयांचा वाहतूक खर्च आणि चालकाचा पगार वगळून लाखो रुपये यातून कमवले जात असल्याची चर्चा आहे.