ठाणे – शहापूर तालुक्यातील तानसा धरण पूर्ण भरले असून धरणातून सध्या ९३.७९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठाणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे.
ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ९२.६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर शहापूर तालुक्यात तब्बल ११५.३ इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तानसा धरणाची क्षमता ही २०८ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. धरण क्षेत्रात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण रात्री ९.३० च्या सुमारास ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली. यामुळे धरणातून सध्या ९३.७९ क्यूसेक्स पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे या गावातील नागरिकांची जवळच्या गावांमध्ये स्थलांतराची व्यवस्था करण्यात आली आहे.