ट्वॉनी कोस्टर हे निम्फैलिडे कुळातील म्हणजेच ब्रश फुटेड वर्गातील आणखी एक फुलपाखरू. अँक्रेईने या नावाने ओळखला जाणारा फुलपाखरांचा एक गट आहे, जो जास्त करून आफ्रिका खंडात सापडतो. भारतीय उपखंडात सापडणारा ट्वॉनी कोस्टर हा यांचा एकमेव सदस्य.

या फुलपाखरांचे नर आणि मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. या फुलपाखरांच्या पंखांची वरील बाजू ट्वॉनी म्हणजे करडय़ा तांबूस रंगाची असते. या तांबूस रंगाच्या पुढच्या पंखांवर काळे ठिपके असतात. पंखाच्या वरच्या कडेला चार ठिपके असतात, तर पुढच्या पंखांच्याच उरलेल्या अध्र्या भागात दोन ठिपके असतात. शिवाय पंखांच्या टोकाची कडा ही काळ्या रंगाची असते. तिचा काळा पट्टा हा पंखांच्या खालच्या किनारीपर्यंत पसरलेला असतो.

या फुलपाखरांच्या मागील पंखांच्या खालच्या टोकाला जाड काळी बॉर्डर असते. त्यात मध्येमध्ये पिवळ्या करडय़ा रंगाच्या ठिपक्यांची माळ असते. शिवाय पंखांच्या मध्यावर ४ आणि त्याखाली जवळपास ६ अस्पष्ट काळे ठिपके असतात.

पंखांची खालची बाजू ही करडी तांबूसच पण थोडी पिवळट असते. पुढच्या पंखांच्या टोकाकडे हा रंग फिक्कट होत जातो. काही वेळा तो चक्क पांढरटही असतो. खालच्या पंखांना ज्या ठिकाणी ठिपके असतात, त्याच ठिकाणी खालच्या बाजूस ठिपके आणि पट्टा असतो. खालच्या बाजूस असणारे ठिपके जास्त गडद असतात आणि काळ्या पट्टीवरील ठिपके जवळपास पांढरेच असतात.

पंख धडाला ज्या ठिकाणी चिकटलेले असतात त्या जागी पांढरे दोन-तीन ठिपके असतात. धड काळ्या रंगाचे असतात आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. मादी फुलपाखरांचे रंग हे थोडे फिक्के असतात.

ही फुलपाखरे जमिनीपासून जास्त उंच उडत नाहीत. त्यांचे उडणेही रमतगमत, निष्काळजी असे असते. याचे कारण अर्थातच त्यांच्या अंगात असणारे विष. त्यामुळेच ही फुलपाखरे संथ उडत असली तरी भक्षक सहसा त्यांच्या वाटेला जात नाहीत आणि अगदी गेलेच तरी ही फुलपाखरे तीव्र दरुगध सोडतात आणि भक्षकापासून सुटका करून घेतात. पक्ष्यांचे किंवा सरडय़ाचे एक-दोन चावे त्याच्या टणक धडाला भेदू शकत नाहीत. भक्षक जवळ असताना ही निपचित पडून राहतात आणि संधी मिळताच पळतात. या फुलपाखरांच्या सुरवंटांची वाढ पॅशन फ्लॉवरसारख्या वनस्पतींवर होते.