ठाणे : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार देताना अनेकदा दमछाक होत असतानाही ठाणे महापालिकेने कर वसुलीच्या आघाडीवर गेल्या आर्थिक वर्षात ठोस असे प्रयत्न केल्याचे अपवादानेच दिसले. याचे स्पष्ट प्रतिबिंब आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी मांडलेल्या अर्थसंकल्पावर उमटले. गेल्या वर्षभरात राज्य सरकारने महापालिकेला ९१४ कोटी रुपयांचे भरीव विकास अनुदान दिले. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात अजून २०० कोटी अशाच अनुदानापोटी जमा होतील अशी महापालिकेला आशा आहे. या अनुदानावर ठाण्याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महापालिकेने कर वसुलीच्या आघाडीवर मात्र सपाटून मार खाल्ला आहे.
करोना काळापासून जमा-खर्चाचे गणित बिघडल्यामुळे तसेच दायित्वाचा भार वाढल्यामुळे ठाणे महापालिका आर्थिक संकटांचा सामना करत आहे. करोना काळ संपल्यावर खरे तर महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी झपाटून काम करायची आवश्यकता होती. मात्र याच काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले. शिंदे यांच्यामार्फत महापालिकेस भरभरुन असे अनुदान राज्य सरकारकडून मिळाले. त्यातून कामेही बरीच झाली. हे होत असताना उत्पन्न वाढीसाठी घाम गाळावा लागतो या उक्तीचा मात्र महापालिकेस विसर पडल्याचे पहायला मिळत आहे. उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता, पाणी पुरवठा, जाहिरात आणि शहर विकास विभागांकडून कर वसुलीत पिछेहाट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात अपेक्षित धरण्यात आलेले महसुली उत्पन्ना २३४ कोटी रुपयांनी घट होईल असा अंदाज आहे. अपेक्षीत धरण्यात आलेल्या उत्पन्नात इतकी घट कशामुळे झाली याचे उत्तर मात्र प्रशासनाला देता आलेले नाही. ठाणे महापालिकेवर एकेकाळी चार हजार कोटी रुपयांचे दायित्व होते. हे दायित्व कमी करण्यात मात्र महापालिकेस यश आले आहे. महापालिकेवर सध्या ११८४ कोटींचे दायित्व आहे.
कर वसुली जेमतेमच
गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाला ८१९ कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. डिसेंबर अखेरपर्यंत या विभागाने ५१२ कोटी रुपये वसुल केले आहेत. मार्च अखेरपर्यंत ७७६ कोटी रुपयांचा कर जमा होण्याचा अंदाज महापालिकेने वर्तविला आहे. शहर विकास विभागास ७५० कोटी रुपयांचे उद्दीष्ट आखून देण्यात आले होते. शहरात चहुबाजूंनी बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे हे उद्दीष्ट सहज गाठता येईल असा विश्वास व्यक्त होत होता. मात्र, डिसेंबरपर्यंत या विभागाने ३८५ कोटी रुपये तिजोरीत जमा केले आहेत. मार्च अखेपर्यंत ५८२ कोटीचा कर जमा होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाणी पुरवठा विभागाला २२५ कोटींच्या कर वसुलीचे उद्दीष्ट होते. त्यातही मोठी घट झाली आहे. जाहिरात विभागाने २४ कोटी ६२ लाखांपैकी डिसेंबर अखेरपर्यंत ९ कोटी ५३ लाख रुपयांची करवसुली झाली असून मार्च अखेरपर्यंत १२ कोटी ३० लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. यासोबतच अग्निशमन दलाने १०० कोटींपैकी डिसेंबर अखेरपर्यंत ५६ कोटींची कर वसुली केली आहे.
ठाणे महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ५०२९ कोटी १ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात मालमत्ता कर, पाणी पुरवठा, जाहिरात, शहर विकास विभाग तसेच इतर विभागांच्या कर वसुलीतून ३४५४ कोटी ५३ लाख रुपयांचे महसुली उत्पन्न अपेक्षित धरले होते. मात्र, या विभागांच्या करवसुली पिछेहाट झाल्यामुळे ३२२० कोटी ४१ कोटी इतकेच महसुली उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून यामुळे महसुली उत्पन्नात २३४ कोटी रुपयांनी घट होणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.