१० महिन्यांत २४३ कोटींची मालमत्ता कर वसुली; ५८ दिवसांत १७१ कोटींची वसुली आवश्यक

भगवान मंडलिक, कल्याण</strong>

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने गेल्या १० महिन्यांत २४३ कोटी सहा लाख रुपयांची करवसुली केली आहे. मालमत्ता करवसुलीचा ४१५ कोटींचा एकूण लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी येत्या ५८ दिवसांत कर विभागाला १७१ कोटी चार लाख रुपये वसुलीचे आव्हान उभे राहिले आहे. ग्रामीण भागात या वर्षी ३९ कोटींची वसुली झाली आहे.

२०१७-१८ च्या तुलनेत या वर्षी ४२ कोटी ७७ लाखाने वाढीव करवसुली झाली आहे. येत्या दोन महिन्यांत करवसुलीचा बहुतांशी लक्ष्यांक पूर्ण करण्यात येईल, असे कर विभागातील विश्वसनीय सूत्राने सांगितले. २०१८-१९ आर्थिक वर्षांसाठी मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य ४१५ कोटी आहे. १ एप्रिल ते २० जानेवारी २०१९ पर्यंत कर विभागाने १० प्रभागांमधून २४३ कोटी सहा लाख रुपयांची करवसुली केली. कर विभागाच्या कागदपत्रांवरून ही माहिती उपलब्ध झाली आहे. या वसुलीत चालू कर मागणीतील १६० कोटी नऊ लाख रुपये, थकीत कर रकमेतील ८२ कोटी ९७ लाख रुपये वसूल करण्यात आले.

१० प्रभागांमधील कर्मचाऱ्यांची दरमहा करवसुली करण्याची क्षमता एक कोटी ३४ लाख रुपये आहे. प्रत्येक प्रभागाने मागील १० महिन्यांत १२ ते ३० कोटींपर्यंत मालमत्ता कर वसूल केला आहे. २७ गावांतील ‘ई’ प्रभाग, कल्याण पूर्व ग्रामीण मधील ‘आय’, ‘जे’ प्रभागांमध्ये या वर्षी लक्षणीय करवसुली झाली आहे. ‘ई’ प्रभागात १५ कोटी ९७ लाखाची वसुली झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही वसुली नऊ कोटींनी अधिक आहे. ‘आय’ प्रभागात सात कोटी ८३ लाख वसुली झाली आहे. मागील वर्षी हीच वसुली चार कोटी ६१ लाख एवढी होती. ‘जे’ प्रभागात १५ कोटी नऊ लाख वसुली झाली आहे. मागील वर्षी हीच वसुली एक कोटी ७६ लाख होती.

आयुक्त गोविंद बोडके, कर निर्धारक संकलक विनय कुळकर्णी यांनी प्रत्येक प्रभागासाठी करवसुलीचे योग्य नियोजन केले होते. वेळोवेळी बैठका घेऊन करवसुलीचा पाठपुरावा केला जात होता. बेकायदा बांधकामांना कर लावण्याचा गोंधळ आयुक्त बोडके यांनी पूर्णपणे थांबविला आहे. कुळकर्णी यांनी कर विषयक विकासक, मालमत्ताधारक यांच्या नियमबाह्य़ व्यवहारांना थारा दिला नाही. त्याचा चांगला परिणाम वसुलीवर झाला असल्याचे सांगण्यात येते. कल्याण पश्चिमेतील ‘नवीन कल्याण’ म्हणून विकसित झालेल्या ‘ब’ प्रभागाने सर्वाधिक म्हणजे ३६ कोटी, ‘क’ प्रभागाने २५ कोटी ३३ लाख, ‘ह’ प्रभागाने २० कोटी ७७ लाख रुपये वसूल केलेत.

लक्ष्यपूर्ती अशक्य?

लक्ष्यांक पूर्तीची १७१ कोटीची करवसुली करण्यासाठी १० प्रभागांतील कर कर्मचाऱ्यांना दररोज दोन कोटी ९५ लाख रुपयांची करवसुली करावी लागेल. ते शक्य नसल्याने या वर्षी एकूण मालमत्ता करवसुली सुमारे ३०० ते ३२५ कोटींपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे ८० ते ९० कोटींची तूट येण्याची शक्यता एका नगरसेवकाने व्यक्त केली. मालमत्ता करवसुली ३०० ते ३५० कोटींच्या आसपास होते हे माहीत असूनही अर्थसंकल्पातील मालमत्ता कराची तरतूद दर वर्षी नगरसेवकांकडून नाहक फुगविण्यात येते. वसुली न झाल्याने तोटय़ाचा फटका पालिकेला बसतो, असेही ते म्हणाले.

मालमत्ता करवसुलीत यंदा चांगली वाढ झाली आहे. कर थकविणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करणे, त्यांचा लिलाव करणे. त्या मालमत्ता पालिकेच्या ताब्यात घेण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. येत्या दोन महिन्यांत कराची वसुली करून वसुलीचा लक्ष्यांक पूर्ण केला जाईल.

– गोविंद बोडके, आयुक्त, कल्याण डोंबिवली पालिका

Story img Loader