आठ महिन्यांत दुप्पट नोंदणी; रिक्षाच्या नोंदणीत मात्र घट
टीएमटीची ढिसाळ सेवा आणि रिक्षाचालकांची मुजोरी याला कंटाळलेल्या ठाणेकरांनी आता वाहतुकीसाठी ‘टॅक्सी’चा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या आठ महिन्यांत ४ हजार ४५८ टॅक्सी टुरिस्ट कॅब वाहनांची नोंद झाली आहे, तर दुसरीकडे नव्या रिक्षांची नोंदणी मात्र ६० ते ७० टक्क्यांनी घसरली आहे. ठाण्यातील रिक्षा वाहतुकीसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जाते.
गेले काही महिने ठाण्यात ओला उबर टॅक्सी सेवा लोकप्रिय झाली आहे. प्रवासी प्राधान्याने या सुविधेचा वापर करू लागले आहेत. त्यामुळेच टॅक्सीच्या नोंदणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे. प्रवाशांशी उर्मट वागणूक, जवळचे भाडे नाकारणे, आपत्तीच्या काळात अवास्तव पैशांची मागणी करणे आदी कारणांमुळे रिक्षा सेवेविषयी प्रवाशांचे फारसे चांगले मत नाही. मात्र ठाण्यात ‘टीएमटी’ची सेवा बिनभरवशाची असल्याने प्रवाशांना नाइलाजाने रिक्षाचा पर्याय स्वीकारावा लागतो. ओला-उबर आल्यानंतर मात्र परिस्थितीत फरक पडू लागला आहे. त्यानिमित्ताने प्रवाशांना उत्तम वाहतूक सेवेचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळेच आतापर्यंत मुंबईपुरतीच मर्यादित असलेल्या टॅक्सी सेवेने सीमोल्लंघन करीत ठाण्यात शिरकाव केला आहे.
गेल्या आठ महिन्यांत ‘टॅक्सी टुरिस्ट कॅब’च्या नोंदणीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मार्च अखेरीस एकूण १ हजार ५९५ टॅक्सींची नोंद झाली होती, नोव्हेंबपर्यंत त्यात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. रिक्षा नोंदणीत मात्र फारशी वाढ झालेली नाही. मार्च अखेरीला ३ हजार ३९५ रिक्षांची नोंदणी झाली होती. नोव्हेंबर अखेरचा ताळेबंद पाहता त्यात वाढ झाली नाहीच, उलट शंभरने घट झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात उबरची सेवा सुरू आहे. या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना एका चांगल्या दर्जाची परिवहन सेवा मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांनाकडूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– शैलेश सावलानी, महाव्यवस्थापक, उबर मुंबई.
ओला-उबरची सेवा पाहता मीसुद्धा या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांना उत्तम मोबदला आणि ग्राहकांना चांगली सेवा असा दुहेरी फायदा आहे.
– अरुण शिंदे, नागरिक